नितीन पंडित
भिवंडी: शहरात इमारतींच्या पार्किंगमधून लहान मुलांच्या महागड्या सायकली चोरीच्या घटना वाढल्या वाढल्या होत्या. विशेष म्हणजे मुलांच्या सायकली असल्याने पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार दाखल होत नव्हत्या. मात्र एका पालकाने भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या पोलीस सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख १४ हजार रुपये किमतीच्या १२ महागड्या सायकली जप्त केल्या आहेत. या मुलांना सोशल मीडियावर व्हिडीओ रील बनविण्याची हौस होती आणि त्यासाठी महागडा मोबाईल वा होता. त्यासाठीच ही मुले महागड्या सायकल चोरून, त्या विकायचे. अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.
बुधवारी धामणकर नाका येथे पावभाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या मुलाची महागडी सायकल चोरीची तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेत भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदळकर, पोलीस निरीक्षक एस एन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक एस एम घुगे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार रमेश आतकरी,अरविंद गोरले,किशोर सूर्यवंशी,रामदास भवर,विजय कुंभार या पथकाने बातमीदाराच्या मदतीने तपास सुरू केला असता भंडारी कंपाऊंड येथील सदानंद हॉटेल येथे दोन संशयित सायकल घेऊन उभे असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन सायकली हस्तगत केल्या.त्यानंतर या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून २ लाख १४ हजार रुपये किमतीच्या एकूण १२ सायकली जप्त केल्या आहेत.विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलांना व्हिडीओ रील बनविण्याची हौस असून त्यासाठी महागडा मोबाईल खरेदी करण्याच्या इराद्याने तो या महागड्या सायकली चोरी करीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे .या दोन्ही विधिसंघर्षग्रस्त आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे .