भिवंडी : विविध राज्यांतून काळ्या बाजारातील रेशनिंगचा गहू आणून त्याचे पीठ पतंजलीच्या वैधता संपलेल्या पिठात मिश्रण करून बाजारात विक्री करणारा कंपनीमालक रमेश शाह व व्यवस्थापक मनोजकुमार यादव यांना गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली.लक्ष्मीकुमार फूड ट्रेडिंग नावाची गव्हाचे पीठ बनवणारी कंपनी अंजूरगाव-आलीमघर रस्त्यावर असून तेथे मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांतील गहू आणून त्याचे पीठ बनवले जाते. हे सरकारमान्य धान्य असून ते काळ्या बाजारातून येथे आणून त्यापासून पीठ बनवले जाते. त्यामध्ये पतंजलीच्या वैधता संपलेल्या पिठात मिश्रण करून ते पीठ पतंजलीच्या नावाने बाजारात विक्री करण्याचे काम सुरू होते. ही माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाल्याने त्यांनी छापा टाकून विविध प्रांतांतून आणलेले धान्य व बनवलेले पीठ जप्त करून कंपनीला सील ठोकले.या रेशनिंगच्या धान्यामध्ये मध्य प्रदेशातील १ लाख ३८ हजार रुपयांच्या ५० किलोच्या २९१ गोण्या गहू, पंजाबमधील २४ हजार १५० रुपयांच्या २९० गोण्या, हरियाणातील ११५० रुपयांची १ गोणी गहू तसेच हजारांच्या संख्येत रिकामे बारदाने, तर १६ लाख ३४ हजार ४१० रुपयांच्या पतंजलीच्या वैधता संपलेल्या पिठाच्या गोण्या व १ लाख ९३ हजार ८०० रुपयांच्या राजश्री गोल्ड पिठाच्या गोण्यांचा समावेश असून पोलिसांनी हा ऐवज जप्त केला आहे.तसेच ही कंपनी सील केली आहे.परप्रांतांतून शिधापत्रिकेवर मिळणारे सरकारचे अनुदानित धान्य येथे आणून त्याचे पीठ बनवून खुल्या बाजारात विकणारी मोठी टोळी सक्रिय असून त्यांनी पतंजलीचे वैधता संपलेले पीठ एकत्र करून त्यात रेशनिंगच्या गव्हाचे पीठ घालून पतंजलीच्या नावाने विक्री करण्याचे षड्यंत्र रचले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ही कंपनी चार महिन्यांपूर्वी सुरू झाली असून त्यांनी आॅनलाइन फूड परवाना मिळवलेला आहे. मात्र, ठाण्याच्या अन्न व औषधे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाºयांनी या ठिकाणी भेट न दिल्याने राजरोसपणे या बेकायदा व्यवसायाला गती मिळाली. परंतु, बाजारात भेसळयुक्त पीठ जाण्याअगोदर ही कारवाई केली.
पतंजलीच्या पिठात रेशनिंगचा गहू , व्यवस्थापकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:34 AM