कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता पाटीदार भवन येथील कोविड रुग्णालय पुन्हा सुरू केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने गुरुवारी दिली. हे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी आपणच पाठपुरावा केल्याचा दावा शिवसेना आणि मनसेनेही केला आहे.
शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पाटीदार भवन कोविड रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आयुक्तांनी ते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी म्हात्रे यांनी पाटीदार भवनात कोविड रुग्णालय चालविणारे डॉ. राहुल घुले यांची भेट घेतली. पाटीदार भवनाची पाहणी केली. या कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्रही सुरू करण्याची पक्षाची मागणी असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी राजेश कदम यांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी पाटीदार भवनाची पाहणी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आतापर्यंत हे कोविड रुग्णालय सुरू व्हायला पाहिजे होते. मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ते बंद होते. कारण मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाली होती. आता रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने हे रुग्णालय सुरू करण्यासाठी डॉ. घुले यांची भेट घेतली. हे रुग्णालय आजच सुरू करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने मनसेला सांगण्यात आले आहे.
-----------------