ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील सेंटरमध्ये डायलेसिस करण्यासाठी आलेल्या नरेंद्र वाजीराने (६१) या रुग्णाची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. डायलेसिस सेंटरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. परंतु, तो हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तीन सदस्यांची त्रयस्थ समिती नेमली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर जे या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.या समितीमध्ये डॉ. योगेश शर्मा (मेडिसिन प्राध्यापक, कळवा मेडिकल कॉलेज), डॉ. प्रतिभा सावंत (बधिरीकरण तज्ज्ञ) आणि डॉ. गुंजोरीकर (किडनी तज्ज्ञ) यांचा सहभाग असणार आहे. ही समिती येत्या काही दिवसांत अहवाल देणार आहे. कोपरी येथील शेठ लाखिमचंद फतीचंद प्रसूतिगृहातील डायलेसिस सेंटरमध्ये वाजीराने हे मार्च २०१८ पासून डायलेसीस करण्यासाठी येत होते. बुधवारीदेखील ते डायलेसिससाठी आल्यानंतर त्यांना आॅक्सिजन लावले होते. मात्र, प्रकृती अचानक बिघडल्याने सेंटरमधील डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. परंतु, हॉस्पिटलमधून बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, आॅक्सिजन संपल्यानंतर त्यांना दुसरे आॅक्सिजन लावेपर्यंत वेळ लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.डायलेसिससाठी येणाºया या रुग्णाला हार्टचा त्रास होता; त्यांची बायपास झाली होती, अशी माहिती ठाणे पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली.ते डायलेसिससाठी आले होते, त्या वेळेस त्यांना शौचाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना शौचालयात नेले होते. येते वेळेसच प्रकृती खालावल्याने दोन आॅक्सिजन लावले. तिसरा बाटला लावताना नातेवाइकांनीच रुग्णाला हलविण्याची विनंती केली. त्यांचा मृत्यू हार्ट फेलमुळे झाला असावा, असे केंद्र यांनी सांगितले.
‘त्या’ रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:30 AM