- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य सुविधा तोगडी पडत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांसह नागरिकात संतापाचे वातावरण निर्माण झाले. बेडसाठी रुग्णाची वेटिंग यादी वाढली असून महापालिका वॉररूम कडून बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे.
उल्हासनगरात एकून बाधित कोरोना रुग्णाची संख्या २ हजारच्या पुढे गेली असून रुग्णांना बेड मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. महापालिका वॉररूममध्ये नागरिक बेड मिळण्यासाठी फोन करतात. मात्र बेड शिल्लक नसल्याचे उत्तरे वॉररुमकडून वारंवार सांगितले जाते. एकूणच शहरातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर गेल्याचा आरोप मनसेचे बंडू देशमुख, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केली. रुग्णांचा ऑक्सिजन बाटला संपल्यावर, दुसरा नवीन ऑक्सिजन बाटला लावण्याची तसदी आरोग्य कर्मचारी घेत नसल्याने, रुग्णाचे जीव जात असल्याचा आरोप केला. जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयात ६ व्हेंटिलेटर व १० ऑक्सिजन बेड आहेत. मात्र तज्ज्ञ डॉक्टर अभावी व्हेंटिलेटर बंद असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. दोन दिवसात व्हेंटिलेटर सुरू न झाल्यास, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनीं दिला.
महापालिकेने रुग्णांच्या सोयीसाठी शासनाचे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालय मध्ये केले. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसात रुग्णालय सुरू होण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. तसेच टाऊन हॉलमध्ये ऑक्सिजन पाईप टाकण्याचे काम झाल्यावर, त्याठिकाणी १५० बेडचे आरोग्य केअर सेंटर सुरू होणार आहे. महापालिकेने दोन शाळेत कोरोना बांधीत असलेले मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी आरोग्य केंद्र सुरू करीत आहे. त्यांच्यावर येथे उपचार करण्यात येईल. सद्यस्थितीत महापालिका कोविड रुग्णालयाकडे बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात रुग्णालयात रुग्णांची वेटींग यादी लागल्याने रुग्णाचे हाल होत असल्याने, महापालिका आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्हे निर्माण झाले.
महापालिकेची वॉररूम नावालाच?
नागरिकांच्या व कोरोना रुग्णाच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या महापालिका वॉररूमकडे अद्यावत माहिती उपलब्ध नाही. महापालिका हद्दीत एकून बेड किती, शिल्लक किती व कोणत्या रुग्णालयात याबाबतची माहिती अद्यावत नाही. वॉररुममध्ये बेड बाबत विचारणा केल्यास, बेड शिल्लक नसल्याचे उत्तर मिळत आहे. एकूणच वॉररुम नावाला असल्याची चर्चा शहरातून होत आहे .