मीरा रोड : मीरा- भाईंदरला कोरोनाचा विळखा पडलेला असताना एका ६ वर्षाच्या मुलीचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा वैद्यकीय अहवाल १७ एप्रिल रोजी आलेला असताना महापालिकेने मात्र तब्बल ६ दिवसांनी त्या मुलीला भार्इंदरच्या कोरोना रुग्णालयात दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.मीरा रोडच्या शांतागार्डन सेक्टर ३ मध्ये राहणाऱ्या एका ६ वर्षीय मुलीस भक्तिवेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयात दाखल करताना कोरोनाची चाचणी केली जात असल्याने त्या मुलीच्या घशातील स्त्रावाचे नमुने १२ एप्रिल रोजी घेण्यात आले. हे नमुने १४ एप्रिल रोजी लॅबमध्ये पाठवले. दरम्यान, रुग्णालयातून या मुलीस घरी सोडले. तर १७ एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजता लॅबने अहवाल दिला की मुलीला कोरोनाची लागण झालेली आहे. असे असतानाही महापालिकेचे वैद्यकीय पथक ६ दिवसांनी म्हणजेच २२ एप्रिल रोजी दुपारी आले व त्यांनी मुलीला तीच्या पालकांसह नेले. तीला भार्इंदरच्या भीमसेन जोशी कोरोना रुग्णालयात दाखल केले. पालिकेच्या बुधवारच्या कोरोना माहितीमध्येही या मुलीचा कोरोना लागण झालेल्या रुग्णात समावेश केला गेला आहे.जर १७ एप्रिल रोजीच लॅबने अहवाल दिला होता तर पालिकेने इतक्या उशीरा रुग्णालयात दाखल का केले असा संतप्त सवाल रहिवाशी मनीष मेहता यांनी केला आहे. या प्रकरणी पालिकेचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यावरही सहा दिवसांनंतर रुग्णाला केले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:50 AM