लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना दुसरीकडे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मोठ्या संख्येने बाह्योपचारसाठी येणाऱ्या रुग्णांना ई नोंदणी साठी तब्बल पाऊण ते एक तास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. तर डॉक्टर उशिराने येणे , तक्रार नोंदवही नसणे आदी तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत.
मीरा भाईंदर महापालिका आणि राजकारणी यांनी मिळून भीमसेन जोशी रुग्णालय महापालिका चालवण्यास असमर्थ असल्याचे सांगून ते राज्य शासनाच्या हवाली केले आहे. मुळात महापालिकेने ऑपरेशन थिएटर पासून अनेक आवश्यक यंत्रणा व सुविधा देखील वेळीच उभारून दिलेल्या नाहीत. त्यातच सदर रुग्णालयाचे व्यवस्थापन राज्य शासना कडून केले जात असले तर महापालिकेचा सहभाग कोविड रुग्णालय आदी माध्यमातून होत असतो.
शहरातील सर्वसामान्य गोरगरिबांना उपचारासाठी खाजगी दवाखाने , लॅब व रुग्णालये परवडत नसल्याने मोठ्या संख्येने बाह्योपचार साठी रुग्ण जोशी रुग्णालयात येत असतात. सध्या ओमायक्रोन व्हेरियंट मुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे वातावरण बदला मुळे ताप , खोकला , सर्दी आदीं सह अन्य आजार बळावले असल्याने रुग्णांची संख्या देखील जोशी रुग्णालयात वाढली आहे.
परंतु रुग्णालयात रुग्णांना केस पेपर काढण्यासाठी ईनोंदणी पद्धती मुळे तास पाऊण तास रांगां मध्ये ताटकळत उभे रहावे लागत आहे. केसपेपर घेतल्या नंतर विविध चाचण्या आदी साठी पुन्हा शुल्क भरण्या करता रांगा लावाव्या लागतात. नोंदणी करणारे कर्मचारी हे कामात दिरंगाई करत असल्याने रांगा वाढतात व रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो असे उपस्थितांनी सांगितले.
येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. डॉक्टर व तद्न्य आदींची वानवा तसेच आजही पालिकेने रुग्णालय म्हणून अत्यावश्यक सुविधा - यंत्रणा न दिल्याने अपघातातील जखमी वा अन्य गंभीर रुग्णांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात सांगितले जाते. डॉक्टर वेळेवर न येणे , तक्रार नोंदवही नसणे आदी अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना नाईलाजाने खाजगी डॉक्टारां कडे जास्त पैसे खर्चून उपचार करण्यास जाणे भाग पडत असल्याचा संताप रुग्णांनी बोलून दाखवला.