लोकमत न्यूज नेटवर्क अनगाव : ज्या कोणार्क आघाडीशी समझोता केल्याच्या मुद्द्यावर भाजापामध्ये बंड झाले, संघ परिवार नवभाजपावाद्यांच्या विरोधात गेला; त्या कोणार्कचे प्रमुख विलास पाटील यांच्या निवडणूक अर्जाला आव्हान देण्यात आल्याने ते अडचणीत आल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि माहिती अधिकाराचे कार्यकर्ते शरद पाटील यांनी विलास पाटील यांच्या अर्जाला आव्हान दिले आहे. अनधिकृत बांधकाम आणि पालिकेच्या करांच्या थकबाकीवरून ते अडचणीत आले आहेत. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली, पण त्यांनी निर्णय राखून ठेवला आहे. विलास पाटील अडचणीत आल्याचे समजताच त्यांच्या कार्यकत्यांनी पालिका कार्र्यालयासमोर एकच गर्दी केली. पण निकाल राखून ठेवल्याने शरद पाटीलही आक्रमक झाले आणि निकाल मिळेपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. कोणार्क आघाडीशी भाजपाचा समझोता असल्याने विलास पाटील अडचणीत आल्यास त्याचा कोमार्क आघाडीला जसा धक्का बसेल, तितकाच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांच्या अर्जावरील निकाल राखून ठेवल्याची चर्चा पालिका कार्यालयाच्या वर्तुळात रंगली होती.भाजपाचे उमेदवार नीलेश चौधरी यांनीही वनखात्याच्या जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप करून त्यांच्या अर्जालाही आव्हान देण्यात आले होते. पण ते रात्री उशिरा फेटाळण्यात आल्याचे समजते.
कोणार्कचे विलास पाटील अडचणीत?
By admin | Published: May 09, 2017 1:07 AM