- सदानंद नाईक उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असतानाही शहराच्या आर्थिक नाड्या शिवसेनेच्या हाती येणार आहेत. स्थायी समिती सभापतीपदाकरिता भाजपच्या विजय पाटील यांना उमेदवारी देतानाच मंगळवारी भाजपचे सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांना समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडून शिवसेनेला बहुमताकडे घेऊन जातानाच पाटील यांचा विजय निश्चित केला. यापूर्वी महापौर, उपमहापौरपद भाजपकडून हिसकावून घेणाऱ्या शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रचलेल्या व्यूहरचनेचे हे यश आहे.उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेना आघाडीने बाजी मारली. स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे असल्याने आता शिवसेना कोणती खेळी करणार, याकडे लक्ष लागले होते. स्पष्ट बहुमत असलेला भाजप कुठल्याही परिस्थितीत स्थायी समिती हातून जाऊ देणार नाही, अशी अपेक्षा होती. स्थायी व प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक गुरुवारी होणार असून स्थायी समिती सभापतीपद खेचण्यासाठी शिवसेनेने भाजपचे समिती सदस्य फोडले. समिती सभापती पदासाठी भाजपकडून जया माखिजा व राजू जग्याशी यांनी तर शिवसेनेकडून भाजपचे समिती सदस्य विजय पाटील यांनी अर्ज दाखल केले. पाटील यांच्या अर्जावर शिवसेना सदस्यांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.
असे आहे स्थायी समितीमधील पक्षीय बलाबल स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी भाजपचे ९, शिवसेना ५ व रिपाइं व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या पाटील यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याने समितीमध्ये भाजप व शिवसेना आघाडीचे प्रत्येकी ८ सदस्य झाले. अशा परिस्थितीत चिठ्ठी काढून सभापतीपदाची निवड झाल्यास भाजपचा सभापती होण्याचा धोका असल्याने मंगळवारी भाजपचे नाथानी यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता शिवसेनेचे बहुमत झाले आहे. गेले दोन दिवस खा. शिंदे हे उल्हासनगरात तळ ठोकून बसले होते. शिवसेना खा. शिंदे यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. भाजप-शिवसेनेची युती महापालिकेत कित्येक वर्षे सत्तेत होती. मात्र आता शिंदे व कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी फोडाफोडी करून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विश्वास गमविला आहे. शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली आहे. - जमनुदास पुरस्वानी, उल्हासनगर शहराध्यक्ष, भाजप
गुरुवारी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना समर्थक विजय पाटील यांचा विजय निश्चित आहे. भाजपला आपले सदस्य सुरक्षित ठेवता येत नसल्यास ती त्यांची चूक आहे. महापौर व उपमहापौरपद शिवसेना महाआघाडी यांच्याकडे असून आता स्थायी समिती सभापती पदासह प्रभाग समिती सभापतीपदही शिवसेना प्रणीत आघाडीकडे येणार आहे. - गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाप्रमुख, शिवसेना सभागृह नेतेपदी भरत गंगोत्री, महासभेत निवड घोषित उल्हासनगर : महापालिका सभागृह नेतेपदी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांची मंगळवारच्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी निवड घोषित केली. त्यापूर्वी शिवसेनेचे राजेंद्र चौधरी यांनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला. ओमी टीम समर्थक नगरसेवक शिवसेनेकडे आल्याने शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे.उल्हासनगर महापालिका स्थायी व विशेष समिती सभापती पदावरून शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसेना आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला खूश करण्यासाठी प्रभाग समिती क्र. ४ च्या सभापतीपदी काॅँग्रेसच्या अंजली साळवे यांना शिवसेनेने बिनविरोध निवडून आणले. तर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना सभागृह नेते पदाचा राजीनामा द्यायला लावून राष्ट्रवादी पक्षाचे भरत गंगोत्री यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घालण्यात आली.उल्हासनगरचे महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद रिपाइंकडे आहे. प्रभाग समिती क्र. ३च्या सभापतीपदी भाजपतील ओमी कलानी टीम समर्थक शुभांगी निकम यांना शिवसेनेने बिनविरोध निवडून आणले. इतर प्रभाग समिती क्र. १ व २च्या सभापती पदीही शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा चौधरी यांनी केला.
विधानसभेत कलानींना उमेदवारी नाकारणे पडले महागमहापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला डावलून महापौर पदासाठी ओमी कलानी टीमसोबत महाआघाडी केली. बहुमतासाठी स्थानिक साई पक्षाला सोबत घेऊन महापौरपदी मीना आयलानी निवडून आल्या. त्यानंतर महापौर पदावरून भाजप विरुद्ध ओमी कलानी असा वाद सुरू झाला.विधानसभेची उमेदवारी दिली नसल्याने निषेधार्थ ओमी कलानी समर्थक नगरसेवकांमध्ये भाजपविषयी रोष होता. त्यांनी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले. तेव्हापासून उल्हासनगरात बहुमत असूनही भाजपला गळती लागली. स्थायी व प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आता शिवसेनेने भाजपत फूट पाडली. महापौर निवडणुकीत साई पक्षाचे १० नगरसेवक भाजपत सामील झाले होते. त्यापैकी काही भाजपतून बाहेर पडण्याचा मन:स्थितीत असल्याचेही बोलले जात आहे.