कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाचा ७०० मेट्रिक टन वजनाचा गर्डर लॉंच करण्यासाठी रेल्वेकडून घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे दररोज डोंबिवलीहून कल्याण व त्यापुढे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. पर्यायी सोय म्हणून कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या बसमध्ये प्रवासी खच्चून भरल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेकांनी रिक्षा प्रवासाचा पर्याय स्वीकारल्याने रिक्षाचालकांनी अव्वाच्यासव्वा भाडेआकारणी केली.
पत्रीपुलाचे काम वर्ष-दीड वर्षे रखडले आहे. पत्रीपुलाचे काम मार्गी लागत असल्याचे समाधान असताना या कामाकरिता शनिवारी घेतलेल्या चार तासांच्या मेगाब्लॉकने डोंबिवली ते कल्याण व त्यापुढे कर्जत-कसारा मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. उद्याही मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने उद्याही हेच चित्र पाहावयास मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका व रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या कामाकरिताच घराबाहेर पडा, असे आवाहन पोलीस व रेल्वे प्रशासनाने केले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पत्रीपूल मेगाब्लॉक त्रासदायक ठरला. मेगाब्लॉकमुळे रेल्वेने २५० फेऱ्या रद्द केल्या होत्या. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत चार तासांंचा मेगाब्लॉक असल्याचे रेल्वेने जाहीर केले होते. लाेकल रद्द केल्याने बस व रिक्षासह खाजगी टॅक्सीचा आधार घेत इच्छित स्थळ गाठावे लागले.
केडीएमटीला एक लाखांचे उत्पन्नकल्याण-डोंबिवली महापालिकेकडून दररोज ५५ ते ६० बसगाड्या चालविल्या जातात. शनिवारी मेगाब्लॉकसाठी परिवहन उपक्रमाने २५ जादा बसची व्यवस्था केली होती. कल्याण-डोंबिवलीदरम्यान २५, कल्याण-टिटवाळादरम्यान ४०, कल्याण-बदलापूर २०, विठ्ठलवाडी-डोंबिवलीदरम्यान १० अशा एकूण ९५ फेऱ्या झाल्या. आजच्या मेगाब्लॉकमुळे १२ हजार प्रवाशांनी या जादा बसमधून प्रवास केला. त्यातून जवळपास एक लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न केडीएमटीला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी यांनी दिली.
प्रवाशांची लूटरेल्वेगाड्या रद्द असल्याने उलटा प्रवास करून डोंबिवली कशी गाठावी लागली. प्रणाली व कुसुम कांबळे या दोघी शुक्रवारी टिटवाळ्य़ात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला भेटायला गेल्या होत्या. त्यांना टिटवाळ्य़ाहून भांडुपला परतायचे होते. शनिवारी त्या रिक्षाने टिटवाळ्य़ाहून कल्याणला आल्या. त्यासाठी त्यांना बरेच जास्त पैसे माेजावे लागले. डोंबिवली ते कल्याणसाठी ३०० ते ३५० रुपये उकळले.