कल्याण : पत्रीपुलावरील वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. पुलाच्या कामातील दिरंगाईमुळे लोकप्रतिनिधी, महापालिका, रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळास टीकेचे लक्ष्य केले जात आहे. याप्रकरणी महासभेत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त करत संताप व्यक्त केल्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुलाचे काम सहा महिन्यांत अर्थात फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण होणार असल्याचा फलक पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी लावला आहे. त्यामुळे अजून सहा महिने वाहनचालकांना कोंडीतूनच वाट काढावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार पुलाची लांबी ११० मीटर तर रुंदी ११ मीटर आहे. पुलासाठी ओपन वेब स्टील गर्डर ७७ मीटरचे आहेत. सेमी थ्रू टाइप स्टील गर्डर ३३ मीटरचे आहेत. १२ मीटर व्यासाचे २२ नग पाइल फाउंडेशन आहे. दोन अबुटमेंट व एक पीअर असे तांत्रिक व बांधकामाचे टप्पे भाग आहेत. आतापर्यंत २२ पैकी पाच पाइलचे काम पूर्ण झाले आहे. अन्य पाच पाइल तसेच ओपन वेब स्टील गर्डर व सेमी थ्रू टाइप स्टील गर्डरचे काम प्रगतीपथावर आहे. पुलाचा सांगाडा हा हैदराबाद येथे तयार करण्यात येत आहे. तो डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत येणे अपेक्षित आहे. तो त्या पुलावर ठेवून पूल वाहतुकीसाठी फेब्रुवारी २०२० अखेर खुला होऊ शकतो, असे महामंडळाने सांगितले आहे.