ठाणे : ‘‘मै इधर का डॉन हूँ’ मला महिन्याला ५० हजारांची खंडणी द्यावी लागेल, अन्यथा मी काय चीज आहे, ते दाखवून देईन आणि तुला जीवे मारेन,’ अशी धमकी देणाऱ्या गणेश शिंदे उर्फ काळ्या गण्या (४५) याच्याविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कळवा पोलिसांनी रविवारी सांगितले.
मुंबईतील रहिवासी खलीउल्लाह कुरेशी (२५) यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. याच व्यवसायाच्या निमित्ताने कळवा परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडून कॉन्ट्रॅक्टवर ते फॅब्रिकेशनची कामे घेत असतात. कळव्यात कुरेशी यांची फॅब्रिकेशनची चांगल्याप्रकारे कामे चालत असल्याची माहिती याच भागातील गुंड गणेश शिंदे याला होती. यातूनच त्याने २७ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास कळव्यातील आई नगरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ कुरेशी यांना गाठले. त्याचठिकाणी गणेश हा त्याच्या अन्य दोन साथीदारांसह आला. कळवा परिसरात हाेणाऱ्या फॅब्रिकेशनच्या कामांसाठी प्रत्येक महिन्याला ५० हजारांच्या खंडणीचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकीही त्याने दिली. ही खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याचीही धमकी त्याने दिली.
या प्रकाराने भयभीत झालेल्या कुरेशी यांनी या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात खंडणी आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपीवर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. गणेश आता कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.