कर्जत : दुसऱ्याचा मत्सर करण्याऐवजी आपला स्तर वाढवा असा मौलिक सल्ला देत मीपणा कमी करायचा असेल तर कर्माकडे लक्ष द्या, कौतुकाची अपेक्षा न करता जोमाने कार्य करीत रहा, असा मंत्र सोमवारी कर्जत येथील आनंद मेळाव्यात जीवन विद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी दिला.
कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे जीवन विद्या मिशनच्या सद्गुरू सहवासमध्ये सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारचा तिसरा दिवस होता. यावेळी मार्गदर्शन करताना प्रल्हाद पै यांनी उपस्थितांना आनंदी जीवनासाठी काही मौलिक मार्गदर्शन केले. मीपणा कमी करायचा असेल तुम्ही कर्माकडे लक्ष द्या, असे सांगत कौतुकाची अपेक्षा न करता कार्य करीत रहा.
तुमच्या कार्याचे मोजमाप नक्कीच होईल. हे ज्याला खऱ्या अर्थाने समजेल त्याचा परमार्थ आणि प्रपंच दोन्ही सुखाचा होईल, असे उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले, तर जीवनात जीवन विद्या तत्त्वज्ञानाचे फक्त कौतुक करत बसण्यापेक्षा आयुष्यात त्याचे आचरण करून जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने करा, असेही शेवटी आवाहन केले. त्यानंतर प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रबोधक दशरथ शिरसाट यांनी अनेक नवीन नामधारकांना अनुग्रह दिला.
पहिल्या सत्रात ज्येष्ठ नामधारक, व्याख्यात्या अनिता मराठे यांनी मानसपूजेचे महत्त्व सांगत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. जीवन विद्या मिशनचे ज्येष्ठ नामधारक अशोक परब यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वैभव निंबाळकर, वास्तुविशारद प्रदीप सुभेदार, राजन मराठे, श्रीराम पराडकर, संतोष सावंत, अनिता मराठे, संजय हरपुडे, विद्या सुभेदार, दीपक काळे, स्वप्नील पराडकर, परशुराम राणे, उत्तम कोळंबे, बाबू घारे, सुदाम पवाळी, सुनील मसणे, जीवन विद्या मिशन व जीवन विद्या फाउंडेशनचे विश्वस्त दीपक काळे, पंकज नाईक, बन्सीधर राणे, श्रीराम मुल्लेमवार, विनोद मालुसरे, शीतल गोरे उपस्थित होते.
जीवन विद्या मिशनची पाळंमुळं अमेरिकेतही-
जीवन विद्या मिशनची पाळंमुळं अमेरिकेतही रुजली आहेत. या आनंद मेळाव्यासाठी खास अमेरिकेतून स्वाती मोरावले आणि आलोक मोरावले हे नामधारक उपस्थित होते. अमेरिकेत राहून ते जीवन विद्येच्या कार्यात सक्रिय आहेत. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.