ठाणे : खाजगी रुग्णालयांच्या बाबतीत ठाणे महापालिकेने नियमावली तयार केली आहे. तसेच त्यांनी किती बिल आकारावे असेही नमूद करण्यात आले आहे. परंतु असे असतानाही महापालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयांकडून आजही लुट सुरु असल्याची बाब समोर आली आहे.
मुंबईतील पोलीसाच्या पत्नीला ठाण्यातील घोडबंदर भागातील खाजगी रुग्णालयाचा वाईट अनुभव आला आहे. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर घरी जाण्यापूर्वी सोडण्यापूर्वी त्यांची पुन्हा कोरोनाची चाचणी न करता त्यांना घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. एवढ्यावरच हे रुग्णालय थांबले नाही, त्यांना बेडवरुन खाली उतरवित पायऱ्यांवर बसविण्यात आले. शिवाय आधी पैसे भरा तेव्हाच तुम्हाला घरी सोडले जाईल, अन्यथा एक दिवस जरी वाढला तरी त्या दिवसाचेही पैसे भरावे लागतील, असे त्यांना सुनावले गेले.
ठाणे महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेल्या लुटीचे अनेक प्रकार समोर आल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिका-यांची बैठक घेऊन खाजगी रुग्णालयाची नियमावली तयार करण्याचे सूचित केले. त्यानुसार नियमावली देखील तयार झाली. तसेच प्रत्येक दिवसाचे किती बिल आकारावे, याचे निर्देशही देण्यात आले. परंतु महापालिकेकडून आम्हाला अद्यापही कोणत्याही प्रकारच्या सुचना आल्या नसल्याचे या रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे. त्यातही एखादा रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी दाखल झाला तर आधी 50 हजार भरा मगच तुम्हाला दाखल केले जाईल असा जणू दमच या रुग्णालयाकडून भरला जात आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या मुंबईच्या पोलिसाच्या पत्नीला देखील या रुग्णालयाचा वाईट अनुभव आल्याची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या पोलिसाच्या पत्नीला घोडबंदर भागातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसानंतर लगेचच त्यांना डिस्चार्च देण्यात आला. परंतु त्यांच्या हाती 80 हजारांचे बिल देण्यात आले.
या पाच दिवसांच्या कालावधीत व्यवस्थित विचारपुसही करण्यात आली नाही, काही थोडीशी औषधे देण्यात आली. परंतु 80 हजारांचे बील त्यांच्या हाती देण्यात आले. जाण्यापूर्वी पुन्हा चाचणी करा अशी विनंतही त्यांनी केली. परंतु त्याची गरज नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आणि बेड रिकामी करण्याच्या सुचना त्यांना देण्यात आल्या. परंतु जोपर्यंत तुम्ही बिल भरत नाही, तोपर्यंत तुम्हाला घरी जाता येणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मी पोलिसाच्या पत्नी आहे, किमान थोडा वेळ थांबा तरी अशी विनंतीही या महिलेने केली. परंतु त्यांना थेट पाय-यांवर बसविण्यात आले आणि बिल भरा मगच घरी जा अन्यथा एक दिवस वाढला तरी त्याचेही पैसे भरावे लागतील असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
या संदर्भात स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याशी त्यांच्या पतीने संपर्क साधला. परंतु डुंबरे यांनाही रुग्णालयाकडून सहकार्य मिळाले नाही. अखेर पैसे भरल्यानंतर रात्री उशिरा त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी दिली आहे.