मुंबई : ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे २०१० मध्ये एका अडीच वर्षांच्या मुलाला पाय गमवावा लागला होता. याबाबत उच्च न्यायालयाने त्याच्या वडिलांना दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करत १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले.
नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देण्याइतके मानवी जीवन निरुपयोगी नाही आहे, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने म्हटले. मुंब्रा येथील रहिवासी मोहम्मद झियाउद्दीन शेख यांच्या याचिकेवर खंडपीठाने हे आदेश दिले.
काय आहे प्रकरण?राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात शिवाजी रुग्णालयाच्या डीन यांनी उपायुक्तांना लिहिलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ पालिकेने घेतला. भरपाईची रक्कम मानवी हक्क आयोगाच्या आदेशामुळे न देता स्वतःहून दिल्याचे पालिकेला वाटले. पालिकेने शेख यांना दहा लाखांची भरपाई दिली. पण याविरोधात शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार भरपाई म्हणून १५ लाख देणे बंधनकारक आहे, असे शेख यांनी याचिकेत म्हटले होते.