लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : वीजचोरी उघडकीस आल्यानंतर पुरेसा कालावधी देऊनही चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम न भरणाऱ्या कल्याण पूर्वेतील एका उद्योजकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने सोमवारी रकमेचा भरणा केल्याचे महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक बुंधे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने मार्च २०२१ मध्ये कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, आमराई, तिसगाव भागात सर्व्हे नंबर ३० एचएन १५ ए आणि एचएन १/२ येथील बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली असता वीज मीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले. याबाबत पंचनामा करून चोरीच्या विजेचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व १५ हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणारे उद्योजक संजय गायकवाड यांना कळवण्यात आले. मात्र, पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने बुंधे यांच्या वतीने गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीजचोरीची फिर्याद देण्यात आली. त्यानुसार ३० जून २०२१ला गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व तडजोडीची १५ हजार रुपयांची रक्कम सोमवारी महावितरणकडे भरली आहे, असे महावितरणने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
‘विजेचा बेकायदा वापर टाळा’
वीजचोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंतचा कारावास व आर्थिक दंड अथवा दोन्हीही शिक्षेची कठोर तरतूद आहे. त्यामुळे विजेचा चोरटा व अनधिकृत वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
-------