धीरज परब मीरा रोड : गुजरातमधील बड्या निर्यातदार व्यापा-यांनी संगनमत करून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरंग्याचे (पापलेट) दर पाडल्याने मनोरीपासून सातपाटीपर्यंतच्या हजारो मच्छीमारांना प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागते आहे. सध्या त्यांनी व्यापा-यांना नाईलाजाने पापलेट देण्यास सुरवात केली असली, तरी दराची शाश्वती नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. दर पाडल्याने मच्छीमारांचे टनामागे दोन लाखांचे नुकसान होणार आहे. याबाबत चर्चा करूनही व्यापारी दाद देत नसल्याने राज्य सरकारला मध्यस्थीची विनंती करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. त्यातूनही प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला आहे.महाराष्ट्रातून कोट्यवधी रुपयांची मासळी खरेदी करून त्याची निर्यात करणारे गुजरातचे व्यापारी नफेखोरी करत आहेत. शिवाय परकी चलन गुजरातकडे वळल्याने राज्याचे आर्थिक नुकसान होत आहे.राज्यात १ आॅगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरु झाला. मुंबई ते पालघर पट्ट्यात मच्छीमारांच्या १७०० बोटी असून अनेक सहकारी संस्था आहेत. मासेमारीत सर्वात जास्त उत्पन्न पापलेटमधून मिळते. दरवर्षी सातपाटी येथील मच्छीमारांचे फेडरेशन मच्छीमारांना चांगला दर मिळावा, म्हणून प्रयत्न करत असते. गुजरातमधील निर्यातदार व्यापाºयांशी चर्चा करुन पापलेटच्या वर्गवारीनुसार दर ठरवला जातो. यंदा मात्र गुजरातमधील निर्यातदार व्यापाºयांनी पाकिस्तान आणि दुबईत मोठ्या प्रमाणात पापलेटचे उत्पादन वाढल्याने तसेच डॉलरचे दर घसरल्याचे कारण पुढे करुन गेल्यावर्षीच्या तुलनेत पापलेटचे दर पाडले आहेत.एका किलोमागे तब्बल २०० रुपयांनी कमी भाव मिळणार असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. मासेमारीचा हंगाम सुरू झाला आणि पापलेटचा साठा करण्याची सोयही उपलब्ध नसल्याने नाईलाजाने दराची हमी नसताना व्यापाºयांना मासळी देण्याशिवाय मच्छीमारापुढे पर्याय राहिलेला नाही. तूर्त चांगला भाव देऊ, या आश्वासनावरच मासळीची विक्री सुरु झाली असून मच्छीमारांना उचल दिली जात आहे.आधीच मासळीचा दुष्काळ त्यात समुद्रातील ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे मासेमारी व्यवसाय संकटात आहे.डिझेल, बर्फ, जाळी, बोटीची देखभाल-दुरुस्ती तसेच खलाशांवर होणारा खर्च वाढला आहे. त्यातच आताचा व्यापाºयाचा दर पाहता यंदा प्रत्येक टनामागे मच्छीमारांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.पापलेटचे दर मोठ्या प्रमाणात पडल्याने सर्वच मच्छीमार बंदरावर चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणी विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी रेमंड बांड्या, लिओ कोलासो, बर्नड डिमेलो , संजय कोळी, रवींद्र म्हात्रे , विजय थाटू, विल्यम गोविंद, नेव्हिल डिसोझा, जोजफ मनोरकर, प्रकाश कोळी, अनिल फाटक, पिटर गंडोली आदींची उत्तनच्या संजय पतसंस्थेच्या कार्यालयात या संदर्भात बैठक झाली. त्यात निर्यातदार कंपन्यांशी चर्चा करु; अन्यथा शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्यातदार व्यापारी कंपन्यांकडून दराला प्रतिसाद न मिळाल्याने आता सरकारकडे दाद मागण्यासह आंदोलनाचा पावित्रा मच्छीमारांनी घेतला आहे.राज्यातीला मच्छीमारांकडून गुजरातचे निर्यातदार मोठ्या प्रमाणात पापलेटसह वेगवेगळी मासळी खरेदी करतात. पूर्वी राज्यात असणाºया बड्या मासळी निर्यातदार कंपन्या बंद पडल्याने मच्छीमारांना गुजरातवरच अवलंबून रहावे लागते. हमीभाव किंवा निर्यातदारांवर शासनाचे नियंत्रण नसल्याने मच्छीमारांची सतत पिळवणूक होते.