कांता हाबळे
नेरळ - कर्जत तालुक्यातील तळवडे गावात राहणारा रेल्वे पॉइंट्समन मयुर शेळेके यांनी १७ एप्रिल रोजी वांगणी रेल्वे स्थानकात स्वःताचा जीव धोक्यात टाकून एका ६ वर्षांचा मुलाचा जीव वाचवला होता. शेकापचे सरचिटणीस आमदार जंयत पाटील यांनी बुधवारी 50 हजार रुपयांचा धनादेश देत मयूरच्या शौर्याला सलाम केला.
खेडेगावात राहणार्या मयुर शेळके यांचे जगभरात सर्वांनीच कौतूक केले. मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, खासदार, आमदारांपासून सर्वंच हितचिंतक नातेवाईकांनी मयुरचे कौतुक केले होते. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी देखील मयुरचे फोन करून कौतुक केले होते. कर्जतमध्ये आल्यावर नक्कीच भेटून तुझ्या या शौर्याचा सन्मान करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. बुधवार ९ जून रोजी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे कर्जतमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मयुर शेळके याची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. मयूरला शाल, पुष्पगुच्छ आणि ५० हजारांचा धनादेश देवून त्याच्या धाडसाचा सन्मान करत पाठीवर शाबासकीची थाप दिली. याप्रसंगी शेकाप नेते विलास थोरवे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, पुरोगामी युवक संघटचे कर्जत तालुका अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष अनिल जोशी, खजिनदार महेश म्हसे, राजन विरले, दिलीप शेळके आदी शेकाप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.