कल्याण : ठाणे महापालिकेतील महिला सहायक आयुक्तांवर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कल्याण-डोंबिवली मनपाचे फेरीवाला कारवाई पथक सायंकाळी स्टेशन परिसरात कारवाईसाठी पोहोचले. मात्र, त्यापूर्वीच तेथील फेरीवाले पसार झाले. त्यामुळे प्रशासनातील फुटीर कोण आहेत, असा सवाल केला जात आहे.
मनपाकडून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. मात्र ती ठोस नसते. त्यामुळे या कारवाईला काही अर्थ उरत नाही. ठाण्यातील फेरीवाल्यांचा उच्छाद आणि दादागिरी उघडकीस आल्याने, बुधवारी केडीएमसीच्या पथकाने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी केली.
स्टेशन परिसरातील महम्मद अली चौकात मनपाच्या कारवाई पथकाची गाडी उभी होती. तेथे प्रभाग अधिकारी राजेश सावंत काही वेळेत पोहोचले. त्यांनी कारवाई सुरू करण्यापूर्वीच महम्मद अली चौक ते शिवाजी चौकातील सगळे फेरीवाले पसार झाले होते. हा प्रकार पाहून कारवाई पथकाने थातूरमातूर कारवाई करीत पदपथावर दुकानदारांनी मांडलेला माल जप्त केला. मनपाची ही कारवाई केवळ दिखावा ठरली. त्यामुळे फेरीवाल्यांचे पुन्हा फावले आहे. मात्र प्रशासनातील फुटीर कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. त्याचा शोध प्रशासनाने घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
--------------------