मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पादचारी पुलाचे भूमिपूजन व पेणकरपाडा तलाव, उद्यानाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पादचारी पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेणकरपाडा येथील उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. यामध्ये खासदार राजन विचारे यांनी ५० लाखांचा निधी दिला होता. तर, स्थायी समिती सभापती प्रभाकर म्हात्रे यांनी त्यांच्या नगरसेवक व प्रभाग समिती निधी मिळून ४० लाख दिले होते. उर्वरित खर्च पालिकेने केला होता. एक कोटी ३५ लाख रुपये एकूण खर्च आला. उद्यानात खुली व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, योगा केंद्र, सकाळच्या वेळी आध्यात्मिक संगीताची सुविधा, मुलांसाठी खेळणी अशी कामे केली आहेत. शिवसेनेच्या वतीने योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर, काशिमीरा हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्ग ओलांडताना भरधाव वाहनांमुळे अपघात होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विद्यार्थी, नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागतो. यातूनच महामार्गावर पादचाऱ्यांसाठी पुलाची मागणी होत होती. (प्रतिनिधी)
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पादचारी पूल
By admin | Published: April 17, 2017 4:47 AM