ठाणे: ठाणे स्थानक परिसरातील रेल्वेचा पादचारी रस्ता चकाचक करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे महापालिकेच्या सहकायार्तून पुढाकार घेतला आहे. या स्थानकातील फलाट क्रमांक एक बाहेरील सुमारे एक हजार ६०० फूट लांबीचा रस्ता हा सिमेंट क्राँक्रीटने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्यावरून चालण्याचा फायदा नागरिकांना आणि प्रवाशांना निश्चितच होणार आहे.
ठाणे स्थानकाचा कायापालट करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. त्यातही काही लहान बाबी सुधारण्यासाठीही बारकाईने पाहिले जात आहे. फलाट क्रमांक एकवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सुटतात. ठाणे पूर्वपेक्षा पश्चिमेकडून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही माेठया प्रमाणात आहे. दादा पाटील वाडी , बी केबिन मधून मोठ्या प्रमाणावरून प्रवासी ठाणे स्थानकात येतात. मात्र, आताचा रस्ता हा दुय्यम दर्जाचा आहे. त्यामुळे चालताना प्रवाशांना त्रास होतो. विशेष करून पावसाळ्यात हा रस्ता अधिक त्रासदायक होतो. परंतु आता हा रस्ता सिमेंट क्राँक्रीटने बांधला जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक रहिवाशांचीही मागणी असल्यामुळे ताे ठामपाच्या वतीने दुरुस्त केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्तावही रेल्वेने ठामपाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. फलाट क्रमांक १ बाहेरील सुमारे १६०० फूट लांब आणि १५ फूट रुंद हा रस्ता क्राँकीटचा होणार आहे. नौपाडा बी केबिन आणि दादा पाटील वाडी रस्त्यांना हा रस्ता जोडला जातो. त्यामुळे रेल्वेसाठी प्रमुख असणारा रस्ता येत्या काही दिवसात खड्डे मुक्त होणार आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, ही जुनी मागणी आहे. रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव रेल्वेने ठामपाला दिला आहे. - केशव तावडे, व्यवस्थापक , ठाणे रेल्वे स्थानक.