ठाणे : तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरु असतांना वरुन गर्डरवरुन खाली पडून एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. या घटनेनंतर एमएमआरडीएने या कामगाराचा मृत्यु कशामुळे याचा तपास घेणार आहे. परंतु दुसरीकडे त्यांच्या मार्फत या कामाच्या ठेकेदावर पाच लाख आणि सल्लागारावर एक लाख दंडाची कारवाई केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाण्यातील तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो ४ चे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडल्याने धनंजय चौहान (३३) या कामागाराचा मृत्यू झाला होता.
मेट्रोचे काम करण्यासाठी खासगी ठेकेदारांची आणि सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा साधने वापरून काम केले जात आहे का याची तपासणी सल्लागारांकडून केली जात असते. त्यामुळे आता यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची एमएमआरडीएने गंभीर दखल घेत ही घटना नेमकी कशी घडली याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश एमएमआरडीएने दिले आहेत. तसेच कंत्राटदाराला पाच लाख रुपये आणि सल्लागाराला एक लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.