ठाणे : ठाणे महापालिकेने यंदा नालेसफाईचे ड्रोनद्वारे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निरीक्षणात सफाई कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असून प्रत्येक स्पॉटसाठी १० हजार रुपये तसेच सफाई व्यवस्थित न झाल्यास त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याची घटना घडल्यास २५ हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांप्रमाणे नालेसफाईची कामे करणाऱ्यांचे देखील दाबे दणाणार आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ३१ मे पर्यंत नाले सफाई पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आली. त्यानुसार नालेसफाईच्या कामात ठाणे शहरात पावसाळ्याच्या कालावधीत पाणी साचून नागरिकांची होणारी गैरसोय व नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नालेसफाईची कामे हाती घेण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी देखील पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे नियोजित कालावधीत व्हावी यासाठी पालिका प्रशासनाने दक्षता घेतली आहे. तसेच यंदाच्या वर्षी नालेसफाईबरोबरच नाल्यांना जोडण्यात आलेली व रस्त्यांच्या कडेला असलेली गटारे यांची देखील सफाई करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई योग्य पध्दतीने न झाल्यास ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. यावर जरब बसावी म्हणून नालेसफाईचे ड्रोनद्वारे निरीक्षण करण्यात येणार असून नालेसफाईत हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नालेसफाई कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर प्रत्येक स्पॉटसाठी १० हजार रुपये तसेच सफाई व्यवस्थित न झाल्यास त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याची घटना घडल्यास २५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दरवर्षी नालेसफाईच्या कामांना १ ते ७ मे र्पयत सुरवात करण्याचा प्रयत्न पालिकेचा असतो. मात्र ही तारीख अनेक वेळा चुकल्याचेही दिसून आले. यंदा मात्र पालिकेने मार्च महिन्याच्या अखेरीसच निविदा प्रसिध्द केली आहे.
महापालिका हद्दीत १२५ छोटे नाले असून ५० हजार ४७१ एवढी या नाल्यांची लांबी आहे. नालेसफाईसाठी नऊ प्रभाग समिती अंतर्गत नऊ कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या असून त्यानुसार प्रत्येक ठिकाणी विविध संस्थांना ही कामे वाटून देण्यात येणार आहेत. यासाठी ९ कोटी ९६ लाख ९७ हजार ९४२ रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
प्रभाग समिती - काढावयाचा गाळउथळसर - ८३७३.७८मुंब्रा - १४१३२.५६दिवा - १२६६७.५०वर्तकनगर - ५५७०.३६कळवा - १४०८४.६४माजिवाडा - १३४४८.८०नौपाडा -कोपरी - १३११९.१७लोकमान्य नगर - ११०६७.०५वागळे - ११४५२.६९