ठाणे : वॉरंटीमध्ये असलेल्या फ्रीजमध्ये होणाऱ्या बिघाडाबाबतच्या ग्राहकाच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करून त्याचे नुकसान करणाऱ्या कोहिनूर टेलिव्हिडिओ प्रा.लिमिटेड आणि पॅनासॉनिक कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १० हजाराचा दंड सुनावला आहे.ठाणे येथील हंसाबेन सेठ यांनी कोहिनूर टेलिव्हिडिओ येथून १९ जुलै २०१२ रोजी पॅनासॉनिकचा फ्र ीज २२ हजारांना खरेदी केला. मात्र वॉरंटी कालावधीतचत्यात काही बिघाड दिसल्याने त्यांनी कोहिनूर आणि पॅनासॉनिक या दोन्ही कंपन्यांना पत्राद्वारे,कायदेशीर नोटीसद्वारे याची माहिती दिली. मात्र कोणीही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्याविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली.कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता हंसाबेन यांनी फ्र ीज खरेदी केल्याची पावती आणि १ वर्षाचे वॉरंटी कार्ड आहे. कोहिनूर टेलिव्हिडीओ यांनी २० जुलै रोजी फ्रीजची डिलिव्हरी दिल्यावर त्यातून उग्र वास येऊ लागला. तसेच त्यातील वस्तू खराब होऊ लागल्याने हंसाबेन यांनी कोहिनूरकडे तक्रार केली. त्यानंतर महिन्याभराने फ्रीजची तपासणी करण्यासाठी कोहिनूरने टेक्निशिअन पाठविला. पाहणी केल्यावर त्याने दिलेल्या रिपोर्टमध्येही फ्रीजमधून वास तसेच खाद्यपदार्थ खराब होत असल्याचे नमूद असून ‘रेफ्रीजिरेटर बदली करना चाहिए’ असा शेरा आहे. पाहणीनंतरही बिघाड कायम असल्याने हंसाबेन यांनी कोहिनूरच्या अधिकाऱ्यांना ८-१० वेळा भेटून दुरूस्ती करण्याची विनंती केली. त्यानंतर ६ डिसेंबर २०१२ रोजी दोन्ही कंपन्यांना पत्र दिले. ती पत्रे त्यांना मिळाल्याची पोहोच पावती मंचात आहे. परंतु त्यानंतरही त्यांनी फ्रीज दुरूस्तीबाबत कोणताही प्रतिसाद न दिल्याने १२ जानेवारी रोजी हंसाबेन यांनी अखेर कायदेशीर नोटीस बजावली. (प्रतिनिधी)
कोहिनूर टेलिव्हिडीओसह पॅनासॉनिकला १० हजाराचा दंड
By admin | Published: October 12, 2016 4:01 AM