ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदानकेंद्रांवर मतदारांच्या सेवेसाठी संबंधित कर्मचारीवर्ग साहित्य घेऊन रविवारीच उपस्थित झाला. यामध्ये केंद्राध्यक्ष, सहायक अध्यक्ष व इतर कर्मचारी आदी ५५ जण साहित्य घेण्यासाठी उपस्थित राहिले नाही. यामुळे ते जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल केल्याचे येथील प्रांताधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.
वारंवार सांगून संबंधित गैरहजर असलेले ५५ कर्मचारी वेळेवर साहित्य घेण्यासाठी डॉ. बांदोडकर महाविद्यालयात उपस्थित राहिले नाहीत. यामध्ये मतदानकेंद्रांचे १२ अध्यक्ष, आठ सहायक अध्यक्ष आणि इतर कर्मचारी ३५ आदी ५५ कर्मचारी साहित्य घेण्यासाठी वेळेत उपस्थित राहिले नाहीत. निवडणूक यंत्रणेने ही शक्यता गृहीत धरुन राखीव कर्मचाऱ्यांचे नियोजन आधीच केले होते. रविवारी सकाळी निवडणूक साहित्य घेण्यासाठी ५५ कर्मचारी न आल्याने त्यांच्याऐवजी तत्काळ राखीव कर्मचाºयांवर संबंधित मतदानकेंद्रांची जबाबदारी देऊन त्यांना त्वरित साहित्यवाटप करून मतदानकेंद्रांवर तैनात केल्याचे स्पष्ट केले.
या गैरहजर कर्मचाºयांनी हेतुपुरस्सर निवडणुकीच्या राष्ट्रीय कामात निष्काळजी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.