जितेंद्र कालेकर/विशाल हळदे, ठाणे
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील येऊर येथे जाण्यास मनाई असतांना तिथे जाण्यासाठी हुज्जत घालणाऱ्या रोहन निलकणी याच्यासह तिघांना वन विभागाने शुक्रवारी तीन हजारांचा दंड ठोठावला. टेनिस खेळण्याच्या नावाखाली त्यांनी येऊर परिसरात जाण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावरच वनकर्मचाऱ्यांनी अटकाव करुनही त्यांनी प्रवेश केल्याने कारवाई केली.गोल्डन स्वाईन कंन्ट्री क्लबमध्ये जाण्यासाठी कारमधून रोहन निलकणी (रा. मानसरोवर, शिवाईनगर, ठाणे) मित्रांसह आले. विनापरवाना सशुल्क पास असल्याखेरिज आत जाता येणार नसल्याचे वनमजूर बाळकृष्ण सावंत आणि नाकेदार अनंता घरत यांनी त्यांना बजावले. मात्र, प्रवेशशुल्कास त्यांनी नकार दिला. वाद घालत ते आत शिरले. अखेर या कारच्या चालकाला ताब्यात घेऊन वनरक्षक संतोष जाधव, सुशील रॉय आणि विशाल घोलप यांनी रोहन आणि त्याच्या मित्रांना प्रवेशद्वारावर आणले.स्वाईन क्लबच्या सदस्यालाही प्रवेश नाहीरात्री ६ नंतर या भागात सशुल्क प्रवेशही नाकारला जात असल्याने स्वाईन क्लबने वनविभागाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात वन विभागाच्या बाजुने निकाल लागला. त्यामुळे या क्लबच्या सदस्यांनाही विनाशुल्क आत प्रवेश दिला जात नाही, असे वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले. राखीव वनक्षेत्रामुळे येऊर परिसरात मद्य प्राशन करणे किंवा बाळगणे तसेच विनापरवाना, विनाशुल्क आत जाण्यासही बंदी आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे येऊरमध्ये जाणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तरीही बेकायदेशीरपणे मद्य बाळगणारे आणि प्राशन करतांना कोणी आढळल्यास त्यांच्याकडून एक हजारांचा दंड तर बेकायदेशीरपणे आत जाणाऱ्याकडून दंडाची वसूली केली जाते.- एस. एस. कोळी, परिमंडळ अधिकारी, येऊर.