ठाणे : दिवारेल्वेस्थानकात (जंक्शन) अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात दिवारेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेत मागील तीन वर्षांत जवळपास एक हजार जण जाळ्यात अडकले आहेत. तर, त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या दिवा रेल्वेस्थानकात एकही गेट अधिकृत नसल्याने ‘आओ.. जाओ घर तुम्हारा...’ अशी या स्थानकाची अवस्था आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकात कुठून कोणीही येजा करताना दिसते. त्यातच रेल्वेलाइनला खेटूनच दोन्ही बाजूला झोपडपट्टी असल्याने तेथील कचराही रेल्वेलाइनवर टाकला जात आहे. तसेच दिव्यात १ ते ८ असे फलाट असून त्याच्यावरून मध्य रेल्वेच्या धीम्या आणि जलद लोकलही थांबतात. तसेच दिवा-रोहा आणि दिवा-मनमाड, दिवा-वसई या गाड्यांचीही येजा सुरू आहे. मध्यंतरी, स्वच्छता भारत अभियानांतर्गत देशातील रेल्वेस्थानकात स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यातून रेल्वेस्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्थानकातील भिंतींची रंगरंगोटी केली. तर, दुसरीकडे, रेल्वे प्रवासादरम्यान, प्रवाशांकडून स्थानकात अस्वच्छ करणाºयांवर दिवा आरपीएफकडून कारवाई केली जात आहे. यासाठी दिवा आरपीएफ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले आहेत. त्या पथकांमार्फत २०१६ ते मार्च २०१९ पर्यंत जवळपास एक हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांना न्यायालयासमोर हजर केलेल्यांना दंड आकारण्यात आला आहे. अशाप्रकारे त्यांच्याकडून एकूण सुमारे तीन लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली.स्वच्छता राखण्याचे प्रवाशांना केले आवाहन२०१६ या वर्षी १९३ जणांना पकडून त्यांच्याकडून ५८ हजार रुपये दंड आकारला आहे. तसेच २०१७ साली १६६ जणांकडून ६२ हजार रुपये दंड वसूल केला. तर, २०१८ या वर्षभरात ४१३ जणांना पकडले आहे. या वर्षात दंडाचा आकडा हा तब्बल एक लाख १७ हजारांच्या घरात पोहोचला. तर, २०१९ च्या पहिल्या तीन महिन्यांत २०१७ या वर्षभरापेक्षा चार केस जास्त दाखल झाल्या आहेत. त्या तीन महिन्यांत १७० जणांना पकडले. तसेच त्यांच्याकडून ४७ हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई अशी सुरू राहणार असून नागरिकांनी आणि प्रवाशांनी स्थानकात तसेच परिसरात अस्वच्छता पसरू नये, तसेच ते स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन दिवा आरपीएफ पोलिसांनी केले आहे.
दिवा स्थानकात अस्वच्छता करणाऱ्यांना तीन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 3:02 AM