ठाणे - सदनिका विक्रीसाठी ग्राहकाकडून पैसे घेऊनही दीर्घकाळ त्याला सदनिकेचा ताबा न देणाऱ्या समर्थ विश्व डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांचा दंड सुनावला आहे.अनिल मनसुखानी यांनी डेव्हलपर्सच्या नियोजित प्रकल्पात आठ लाख ५० हजारांना एक सदनिका आरक्षित केली. अनिल यांनी संपूर्ण रक्कम दिली आणि विक्री करारनामा केला. मात्र, डेव्हलपर्सने त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही. त्यानंतर, त्यांना दुसºया सदनिकेचा ताबा देण्याचे मान्य केले. त्याचा करारनामा केला. मात्र, २०१३ किंवा २०१५ मध्ये वेगवेगळ्या इमारती व सदनिकेचे करारनामे करून त्यापैकी दोन्हींचा ताबा दिला नाही. पाठपुरावा केला असता सर्व करारनामे रद्द करून रक्कम धनादेशाद्वारे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, धनादेश न वटता परत आल्याने मंचाकडे तक्रार दाखल केली. मंचाने डेव्हलपर्सला पाठवलेली नोटीस परत आली.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता अनिल यांनी डेव्हलपर्सला साडे आठ लाख दिल्याचा बँकेचा खातेउतारा आहे. तसेच पर्याय म्हणून सुचवलेल्या तीन वेगवेगळ्या सदनिकांचे करारनामे असूनही ताबा दिलेला नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिल यांनी पोलीस स्टेशनमध्येही डेव्हलपर्सविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून डेव्हलपर्सने पैसे घेऊनही सदनिकेचा ताबा न देता अनिल यांची फसवणूक केली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे डेव्हलपर्सने त्यांना सदनिकेचे करारनामे रद्द करून १५ लाख आणि मानसिक त्रास व न्यायिक खर्च मिळून ३५ हजार रुपये द्यावेत, असे आदेश मंचाने दिले आहेत.
ताबा विलंबाने देणे भोवले, डेव्हलपर्सला ३५ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 6:36 AM