ठाणे : एका ग्राहकाशी सदनिका विक्रीचा करार करून त्याच्याकडून पैसे घेऊनही ती सदनिका परस्पर तिसऱ्या व्यक्तिला विकणाऱ्या चंद्रकांत चहाल यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १० हजाराचा दंड सुनावला आहे.रेखा दुबे यांनी चंद्रकांत चहल यांच्या मालकीची म्हारळ येथील सदनिका ६ लाखांना घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी २ लाख रूपये त्यांना दिल्यावर जानेवारी २०१४ ला करारनामा झाला. उर्वरित ४ लाख एप्रिल २०१४ पूर्वी देऊन सदनिकेचा ताबा देण्याचे मान्य करण्यात आले. एप्रिल २०१४ पर्यंत उर्वरित रक्कम न दिल्यास बुकिंगचे २ लाख परत केले जाणार नाहीत, असे चहल यांनी सांगितले. त्यापूर्वी ही खोली त्रयस्थाला विकल्यास बुकिंगची रक्कम आणि नुकसानभरपाई मिळून ४ लाख दुबे यांना देऊ, असे त्यांनी मान्य केले होते. तरीही चहाल यांनी ही खोली गवळी नावाच्या महिलेला विकली. याबाबत दुबे विचारणा करण्यास गेल्यावर त्यांना शिवीगाळ करू न २ लाख परत करण्यास नकार दिला. दुबे यांनी पोलीस स्टेशनमध्येही तक्रार केली. अनेकदा घराचा ताबा मागितला परंतु तो दिल्याने त्यांनी चहाल यांच्याविरोधात मंचाकडे तक्रार केली.दोघांतील कराराच्या कागदपत्रांची, पुराव्यांची पडताळणी केली असता दुबे यांनी ठरलेल्या काळात उर्वरित रक्कम देऊन सदनिकेचा ताबा मागितल्याचे मंचाच्या निदर्शनास आले. परंतु चहाल यांनी तो दिला नाही. यावरून दुबे यांना विकलेली खोली अन्य त्रयस्थ व्यक्तिला विकून त्यांनी फसवणूक केली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे चहाल यांनी दुबे यांना २ लाख रूपये १२ टक्के व्याजासह द्यावेत आणि तक्रार खर्च म्हणून १० हजार द्यावेत, असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
विकलेले घर तिसऱ्याला दिल्याने दंड
By admin | Published: March 15, 2017 2:27 AM