लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठरलेल्या गुंतवणूक योजनेनुसार मुदतीअंती ग्राहकाला पैसे न देता त्याला सदोष सेवा देणाऱ्या पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या व्यवस्थापकाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १२ हजारांचा दंड सुनावला आहे.रमेश पारखे यांनी पॅनकार्ड क्लब इंडिया यांच्या योजनेमध्ये डिसेंबर २०१२ रोजी १०१०२० रुपये ३ वर्षे ३ महिने मुदतीसाठी गुंतवले होते. पॅनकार्ड क्लबने मार्च २०१६ मध्ये मुदतपूर्तीनंतर रमेश यांना १४११२० रुपये देण्याचे मान्य केले होते. ते देण्यासाठी रमेश यांनी क्लबला ठेव पावती व बँकेचा खाते क्रमांक दिला. मुदतपूर्तीनंतर अनेकदा रकमेची मागणी केली. मात्र, त्यांनी रमेश यांना ठेव रक्कम आणि व्याज दिले नाही. त्यामुळे रमेश यांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेडविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. पॅनकार्ड क्लबला नोटीस मिळाल्याची पोच उपलब्ध आहे. मात्र, त्यांच्या वतीने कोणीही बाजू स्पष्ट केलेली नाही.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता रमेश यांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या एका योजनेंतर्गत १०१०२० रुपये गुंतवले होते. त्याची पावती मंचात आहे. ३९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर रमेश यांना १४११२० रुपये देण्याचे पॅनकार्डच्या वतीने मान्य केल्याचे प्रमाणपत्रावरून दिसते. मुदतपूर्तीनंतर रमेश यांनी मूळ प्रमाणपत्र जमा करून मान्य केलेली रक्कम देण्याची मागणी केली. मात्र, पॅनकार्ड क्लबने ती परत केली नाही. रमेश यांनी २०१६ साली सलग तीन महिन्यांत पॅनकार्डला नोटीस पाठवली. परंतु, पॅनकार्डने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
पॅनकार्ड क्लबच्या व्यवस्थापकाला दंड
By admin | Published: May 12, 2017 1:40 AM