लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर/ मुरबाड : अनेक वर्षे प्रलंबित असलेला व दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन केलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावणार, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे प्रयत्न करत होते. कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री पदी निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा कार्यभार सांभाळत असतानाच त्यांनी कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा नव्याने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदी रावसाहेब दानवे यांची निवड झाल्याने कपिल पाटील आणि कथोरे यांनी दानवे यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे मार्गाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, यासाठी त्यांना निवेदन दिले. दानवे यांनी याबाबत जातीने लक्ष घालून हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या मार्गाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. सततचा पाठपुरावा यामुळे या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करू शकलो, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली. दानवे यांच्याकडे रेल्वे विभागाची जबाबदारी सोपविल्याने व कपिल पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
----------
कर्जत ते कसारा नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा
ठाणे जिल्ह्यातील कसारा ते कर्जत ही रेल्वे स्थानके जोडणारा नवीन रेल्वे मार्ग मंजूर करावा, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीदरम्यान केली आहे.
मुंबई व नाशिक या शहरांवर रेल्वे प्रवासी संख्येचा वाढता ताण पाहता आणि या मार्गावरील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, कर्जत ते कसारा असा जोड रेल्वे मार्ग मंजूर केल्यास त्याचा फायदा पुणे व मुंबई शहरात ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार आहे. कर्जत कसारा रेल्वे मार्ग माल वाहतुकीसही सोयीचा होणार आहे.