ठाणे : मंडप उभारण्यासाठी पालिकेच्या परवानगीकडे पाठ फिरवणाºया नवरात्र मंडळांनी कारवाईच्या भीतीने पालिकेची परवानगी घेण्यास सुरु वात केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परवानगी घेणाºया मंडळांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी ठाणे शहरात मंडप उभारणाºया मंडळांची संख्या १५० च्या आसपास होती. यंदा आतापर्यंत ही संख्या ३०० च्या पुढे गेली आहे.
नवरात्रोत्सवासाठी मंडप उभारण्यासाठी पालिकेने आॅनलाइन सुविधादेखील उपलब्ध करून दिली होती. यापूर्वी वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी मिळाल्याशिवाय अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते. आता ज्या मंडळांकडे गेल्या वर्षीची वाहतूक पोलीस आणि पोलीस ठाण्याची परवानगी असेल, अशांना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र २४ तासांच्या आत देण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गणेशोत्सवादरम्यानच दिले होते. ही परवानगी देताना यावर्षी मंडप उभारण्यासाठी केलेल्या अर्जामध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच मंडपाचे ठिकाण आणि मंडपाचा आकार तशा प्रकारचा असायला हवा, अशी अट टाकली आहे. मात्र, असे असतानाही पहिल्याच दिवशी विनापरवाना मंडप उभारण्यावरून पालिका प्रशासन आणि खारटन रोड येथील नवरात्रोत्सव मंडळामध्ये वाद झाला होता. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या मंडळाचा मंडप जमीनदोस्त केला. मात्र, बुधवारी पुन्हा मंडप उभारल्याने पालिकेने पुन्हा कारवाई केली होती.
प्रभागनिहाय भरारी पथके स्थापन
- विनापरवाना मंडप उभारणाºया मंडळांवर सुरूवातीपासूनच कारवाईची भूमिका महापालिकेने घेतल्याने यांचा परिणाम म्हणून यावर्षी परवानगी घेणाºया मंडळांची संख्यादेखील वाढली आहे.
- गेल्या वर्षी महापालिकेची परवानगी घेणाºया नवरात्र मंडळांची संख्या केवळ १५० आसपास होती. मात्र, यावर्षी ती ३१० गेली असल्याची माहिती पालिकेचे अतिक्र मण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली.
- विनापरवाना मंडप उभारणाºया मंडळांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने प्रभाग समितीनिहाय भरारी पथके तयार केली आहेत. ही पथके मंडप उभारण्यासाठी परवानगी आहे की नाही, यांची चौकशी करत आहेत.