कल्याण : दिव्यांग पेन्शनसाठी अकार्यक्षमतेचा दाखला सादर करण्याची अट केडीएमसीच्या महासभेने वगळताच १८१ जणांना पेन्शन लागू करण्याबाबतच्या प्रस्तावाला सोमवारी महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच ११ दिव्यांगांना व्यवसायासाठी तर दोन जणांना विवाहासाठी अर्थसाहाय्य देण्याचा मुद्दाही प्रस्तावात होता. त्यालाही हिरवा कंदील दाखविण्यात आला.२०१६ च्या सुधारित प्रस्तावानुसार पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करावयाचा आहे. याअंतर्गत ६० वर्षांवरील व सरकारी रुग्णालयांनी काम करण्यास अकार्यक्षम घोषित केलेल्या दिव्यांगांना पेन्शन देण्यात येते. यावर राज्यातील महापालिकेत मागेल त्याला सरसकट पेन्शन देण्यात येते.
मात्र, केडीएमसीच्या रुग्णालयातून अकार्यक्षमतेचा दाखलाच दिला जात नसल्याने पेन्शनपासून दिव्यांगांना वंचित ठेवावे लागत असल्याच्या मुद्याकडे डोंबिवलीमधील दिव्यांग दत्तात्रेय सांगळे यांनी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांचे लक्ष वेधले होते. तसेच सांगळे यांनी सप्टेंबरमध्ये तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही पत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, बोडके यांनी महासभेत अकार्यक्षमतेचा दाखला बंधनकारक केल्याची अट वगळण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्याला २० डिसेंबरच्या महासभेत मान्यता मिळाल्याने दिव्यांगांना पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अट वगळताच सोमवारच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत दाखल झालेल्या १८१ जणांना पेन्शन लागू करण्याच्या प्रस्तावाला सभापती रेखा चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांनी हिरवा कंदील दाखविला. या मान्यतेमुळे लवकरच संबंधित दिव्यांगांना पेन्शन मिळणार असल्याची माहिती समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी दिली.ओपन जिमचे प्रस्तावही मंजूरमोहने कोळीवाडा येथील कांतिलाल कॉम्प्लेक्स परिसरात, हेदुटणे, कोळेगाव येथील स्मशानभूमी परिसरात आणि माणगाव, सोनारपाडा तलाव परिसरात येथे ओपन जिम बसविण्याचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले.सदस्यांची शेवटची सभामहिला बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी आणि सदस्यांची सोमवारची सभा शेवटची होती. या सर्व सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी रविवारी संपत आहे. नवीन समिती नुकतीच स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, अखेरच्या सभेत सभापती चौधरी आणि सदस्यांनी प्रशासनाचे उपायुक्त मिलिंद धाट आणि सचिव संजय जाधव यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.