ठाणे : इंधन महागले... प्रवास करणार कसा? अन्नधान्य महागले... विकत घेणार काय? सिलिंडर महागले... अन्न शिजवणार कसे? असे सवाल करणारे प्रश्न असलेला फलक चक्क भाजप कार्यालयासमोरच लावून ‘असह्य होतेय महागाईची मार... पळवून लावू मोदी सरकार’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केंद्र सरकारला लगावला.
क्रूड ऑइलचे दर आवाक्यात असतानाही इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. या फलकावर ‘जबाब दो’ असे म्हणत शिजवायचे कसे, खायचे काय, प्रवास करायचा कसा? असे प्रश्न उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांनी आता उत्तर द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. यासंदर्भात आनंद परांजपे पत्रकारांशी म्हणाले की, वाढलेल्या इंधन दराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘जबाब दो... जबाब दो’ असा मजकूर असलेले होर्डिंग्ज सबंध ठाणे शहरात लावलेले आहेत. पंतप्रधान केवळ आपल्या मन की बात ऐकविण्यात मग्न आहेत. त्यांना जनतेच्या मनातील प्रश्न ऐकण्यात स्वारस्य नाही. त्यांनी आता जनतेची ‘मन की बात’ ऐकावी, यासाठी हे बॅनर लावले असल्याचे त्यांनी सांगितले.