सदानंद नाईक
उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षाच्या माजी आमदार, महापौर ज्योती कलानी यांच्या अंत्ययात्रेवेळीं दर्शन घेण्यासाठी शेकडो नागरिकांनी कोरोनाचे निर्बंध डावलून रस्त्यावर आले. स्मशानभूमी जवळ एकत्र आलेल्या हजारो नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. १४ दिवसाच्या पेरॉलवर आलेल्या पप्पू कलानी व मुलगा ओमी कलानी यांनी मुखाग्नी दिला.
उल्हासनगरात पप्पू कलानी यांनी उभे केलेले राजकीय साम्राज्य अबाधित ठेवण्यासाठी व शहर विकासासाठी ज्योती कलानी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. तसेच त्यांनी नगराध्यक्ष पदासह महापालिका स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, महापौर, आमदार आदी अनेक पदे भूषविली. त्या अनेक वर्षे राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा होत्या. रविवारी कलानी महल मध्ये सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरताच सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान पती पप्पू कलानी हे जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्यांना पत्नीचे अंत्यदर्शन होण्यासाठी पेरॉलवर सुटण्याची विनंती न्यायालयाकडे कुटुंबाकडून करण्यात आली. यांना १४ दिवसाचा पेरॉल मंजूर झाला असून ते पत्नी ज्योती कलानी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन मुलगा ओमी कलानी यांच्या सोबत मुखाग्नी दिला आहे. कलानी महल येथून सोमवारी दुपारी अड्डीच २ वाजता अंत्ययात्रेला सुरवात झाली. अंत्ययात्रेवेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधानाचे उल्लंघन तोडून एकच गर्दी केली होती.
स्वर्गरथात ठेवलेल्या ज्योती कलानी यांच्या मृतदेहा जवळ पप्पू कलानी, ओमी कलानी यांच्यासह त्यांचे दोन मुले, नारायण कलानी व ओमी कलानी यांचे निकटवर्ती होते. तर स्वर्गरथा सोबत असंख्य पोलीस, कलानी समर्थक सोबत होते. रविवारी रात्री राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, आमदार गणपत गायकवाड यांनी कलानी महल येथे येऊन अंत्यदर्शन घेतले. तर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आदींनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करून ज्योती कलानी यांना श्रद्धांजली वाहिली. स्थानिक आमदार कुमार आयलानी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, सभागृहनेते भारत गंगोत्री यांनीही श्रद्धांजली वाहिली. चौकट *कोरोना काळात अंत्ययात्रेला हजारोचा समूह? मनमिळाऊ असलेल्या ज्योती कलानी सर्वसामान्य नागरिकांत मिसळून त्यांच्या समस्या सोडवित होत्या. त्यामुळे त्या सिंधी समाजसह बिगर सिंधी समाजात प्रसिद्ध होत्या. त्यांचे अंतदर्शन घेता यावे म्हणून नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करून रस्त्यावर व अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. नागरिकांना पांगविण्यासाठी नागरिकांची दमछाक उडाली होती.
कलानी महल समोर कडक बंदोबस्त
ज्योती कलानी यांचा मृत्यू झाल्याने, त्यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठीं नागरिकांची गर्दी उसळू नये म्हणून, पोलीस प्रशासनाने कलानी महल भोवती कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कलानी महलात येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद पोलीस ठेवत असल्याचे चित्र होते.
पप्पू कलानी यांना १४ दिवसाची पेरॉल
इंदर भतीजा हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पप्पू कलानी यांना पत्नी ज्योती कलानी यांची अंत्यदर्शन घेण्यासाठी व इतर धार्मिक क्रिया पार पाडण्यासाठी १४ दिवसाची पेरॉल मंजूर झाला. सकाळी कलानी महलात दाखल होऊन, पप्पू कलानी यांनी पत्नी ज्योती कलानी यांचे अंत्यदर्शन घेतले.
थकलेले दिसले पप्पू कलानी
दोन वेळा जेल मधून असे एकून चार वेळा आमदार पदी निवडून आलेले पप्पू कलानी यांनी शहराचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. शहरात सत्तेच्या केंद्रस्थानी कलानी कुटुंबाला ठेवणारे पप्पू कलानी १४ दिवस पेरॉलवर सुट्टीवर आले. त्यांना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र अंत्यसंस्कार वेळी ते थकलेले दिसले, तब्येत आजही काटक असल्याचे दिसत होते.