भातसानगर : शहापूरमधील वारघडेनगर, तावडेनगर, रिद्धी-सिद्धीनगर, गोनेनगर, कमलनगरासह गोठेघर व चरपोली ग्रामपंचायतीच्या व आजूबाजूच्या असंख्य नागरिकांना वारघडेनगर ते महिला मंडळ शाळा व खाडे मैदानादरम्यानचा रहदारीचा रस्ता खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीला न्याय न मिळाल्यास रहिवाशांनी कुटुंबासह आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर ठाणे नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभ यांनी या मागणीची दखल घेत रहिवाशांना हा रस्ता जोडण्याचे आदेश शहापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
महिनाभरापूर्वी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या रस्त्याची मागणी केली होती. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नगरसेवकांनीही उपस्थित राहून शहापूरनगरातील वेटेवाडी, वारघडेनगर ते महिला मंडळ खाडे विद्यालय हा जुना रस्ता आधीपासून रहदारीचा रस्ता असल्याचे दाखवून दिले होते. अखेर, स्थानिक प्रतिनिधी व रहिवासींची मागणी योग्य असल्याचे दिसून आले. दरम्यान, नगरपंचायत हद्दीतील वारघडेनगर, गोपाळनगर, तावडेनगर व इतर नगरांतील विद्यार्थी, महिला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना हा जवळचा रस्ता होता. ही बाब मान्य करून ठाणे नगररचनाकार विभागाचे सहायक संचालकांनी रस्ताजोडणीचे आदेश नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने आता नगरवासीयांचा रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय, नगरपंचायतीने अंतर्गत रस्त्यालगत कुंपण व भिंतीचे बांधकाम करत येणारे नाही अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे, जेणेकरून रहिवाशांची रस्त्याची गैरसोय होणार नाही, असे या पत्रात नमूद केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.