ठाणे : ‘माहिती घेण्याकरिता आज वेगवेगळी सोशल माध्यमे उपलब्ध असतानाही वर्तमानपत्रांवरचा लोकांचा विश्वास कायम आहे. त्यामुळे तो विश्वास कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी मुद्रित माध्यमांवर आहे. आजही पेपरमध्ये छापून आलेलेच खरे असते, यावर लोकांचा विश्वास आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.
‘लोकमत’च्याठाणे येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, माध्यमांचे स्वरूप बदलत आहे. डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मजकूर येत आहे. ताे मजकूर खरा की खोटा, याचा अर्थ लागत नाही. त्यावेळी ‘लोकमत’सारख्या प्रिंट माध्यमांची जबाबदारी वाढते. कारण त्यांना तत्त्व आणि ध्येय टिकवतानाच समाजाला विचारांची दिशा देण्याचे कामही करावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.
आजूबाजूला कितीही बदल झाले तरी ‘लोकमत’चा बाज बदलत नाही. हाच बाज मराठी माणसाच्या मनात पक्का बसला आहे. त्यामुळेच ‘लोकमत’ आणि महाराष्ट्रातील जनतेचे अतूट नाते आहे. यंदा दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यांनी ‘लोकमत’ जनतेमध्ये रुजवला. त्यामुळेच लोकांचे मत, भावभावना यांचे दर्शन आपल्याला ‘लोकमत’मधून कायम दिसते. म्हणून लोकांना ‘लोकमत’ आपला वाटतो. दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्यानंतर विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि आता तिसरी पिढी देवेंद्र, ऋषी व करण दर्डा यांनीदेखील तोच भाव केवळ जपलाच नाही तर वाढवण्याचे कामही केले, असेही फडणवीस म्हणाले.
प्रारंभी देवेंद्र दर्डा यांच्या हस्ते तसेच समूह संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पंजाबराव उगले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी केले तर ‘लोकमत’ मीडियाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी आभार मानले.
वाचन संस्कृती जपण्याचे आव्हान - जितेंद्र आव्हाड
माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, वाचन संस्कृती जपण्याचे आव्हान सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात मुद्रित माध्यमांपुढे आहे. मात्र, मुद्रित माध्यमांचे महत्त्व जराही कमी झालेले नाही. ‘लोकमत’ हे तर न थांबणारे व्यासपीठ आहे. सतत त्यांचे काही ना काही कार्यक्रम होत असतात. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा यांच्या गोड स्वभावामुळे तुमचे सर्वांशी घट्ट नाते आहे. म्हणून ‘लोकमत’ राज्यात नंबर एकवर आहे. प्रिंट मीडियामध्ये ‘लोकमत’चा हा नंबर कोणीच घेऊ शकत नाही, असेही आव्हाड म्हणाले.
हा तर एक चांगला याेगायाेग - देवेंद्र दर्डा
‘लोकमत’चे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा म्हणाले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर ‘लोकमत’च्या ठाण्यातील विस्तारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित असणे एक चांगला योगायोग आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ज्या कामाला हात लागतो त्यात यश नक्की असते, असे म्हणत दर्डा यांनी दोन्ही नेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रासह भारतातही ‘लोकमत’ अग्रेसर आहे व समाजहिताची कामेही करत आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या काळात टॉप १० डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये ‘लोकमत’चा सहभाग राहणार आहे. ‘लोकमत’च्या विश्वासार्हतेला कधीही तडा जाणार नाही, याची काळजी घेणे ही आमची सर्वांत मोठी जबाबदारी मी मानतो, असेही ते म्हणाले.