विशाल हळदे
ठाणे - ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकरांनी एकत्र येत मंगळवारी सकाळी (4 सप्टेंबर) मानवी साखळी तयार केली. हातात फलक घेऊन ठाणेकरांच्या या समस्या सोडवण्यासाठी आनंद नगर टोल नाक्याजवळ ठाणेकर एकवटले होते. कोपरी पूल आणि आनंद नगर टोल नाका येथील वाहतूक कोंडीमुळे हा मार्ग वापरत असणाऱ्या प्रत्येक ठाणेकर आणि मुंबईकरांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.
टोल नाका व कोपरी पुलामधील अंतर अंदाजे 1 -2 कि.मी. आहे आणि ऐन गर्दीच्या वेळेत हे अंतर पार करण्यासाठी 30-45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. या परिस्थितीत नागरिकांच्या कामाचे व इंधनांचे नुकसान होते. तसेच प्रवाशांच्या मानसिकतेवर ही परिणाम होतो. नागरिकांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी सर्व समस्या तशाच आहेत. त्यामुळेच 300 पेक्षा जास्त ठाणेकरांनी एक मानवी साखळी निर्माण करत त्यासंदर्भात एक ठराव मांडण्याची मागणी केली आहे.
अंदाजे 60000 वाहने दररोज हा मार्ग वापरत आहेत आणि दरवर्षी 100 कोटींपेक्षा जास्त टोल देत आहेत. मात्र तरिही वाहतूक कोंडी आणि खड्डे या समस्येचा सामना हा करावा लागतो. या मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी सांगितले की, मुंबई झोन मधून दर वर्षी 22 हजार कोटी रुपये थेट कर स्वरूपात दिले जातात आणि ते कोपरी पुलाच्या विस्तारामध्ये कोणताही विलंब स्वीकार करू शकत नाही. उपस्थित सदस्यांनी अशी मागणी केली की जो पर्यंत कोपरी पुलाचा विस्तार होत नाही तोपर्यंत सरकारने कुठल्याही वाहनाकडून टोल गोळा करू नये आणि ठाण्यामध्ये नोंदणीकृत सर्व वाहनांकडून टोल रद्द करावा.