ठाणे: केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशातील अर्थव्यवस्था उध्वस्त केली आहे. देशात जातीयवादी शक्ती सक्रीय झाली आहे. जनतेनेच आता अशा जातीयवादी शक्तीला रोखले पाहिजे, असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री नसीम खान यांनी रविवारी ठाण्यात केले.
संपूर्ण महाराष्ट्रात १४ ते २९ नोव्हेंबर पर्यंत राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा प्रारंभ भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.विक्र ांत चव्हाण,जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश ठाणेकर,प्रदेश काँग्रेस सचिव अनिस कुरेशी,महेश कांबळे,मोहन तिवारी,सुखदेव घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खान म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या काही धोरणात्मक निर्णयामुळे सर्व सामान्य जनता हवालदिल असून देशातील व्यापार उद्योगात याचा खूप मोठा फटका बसला आहे. साहजिकच त्याचा परिणाम सर्व क्षेत्रातील संबधितांना बसत आहे. काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने जनआंदोलन करीत आली आहे. तरीही केंद्रातील भाजपा सरकारला जाग येत नसून आता जनजागरण अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे सागितले.
संपूर्ण महाराष्ट्रात हे जनजागरण अभियान राबविण्यात येणार असून १४ नोव्हेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी हे अभियान सुरू केल्याचे सांगून संविधान दिनी म्हणजेच २९ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान चालू राहणार आहे. संपूर्ण शहरातील विविध भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने वाढती महागाई, वाढती बेरोजगारी बाबत जनतेमध्ये जाऊन जनजागरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.