ठाणे : दिग्दर्शक आणि निर्माता मनमोहन देसाई यांच्या अनेक चित्रपटांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्याच चित्रपटातील काही निवडक गाणी सादर करत ब्रम्हांड कट्ट्याच्या कलाकारांनी मनमोहन देसाईंना आदरांजली अर्पण केली. कोरोनादरम्यान गेले वर्षभर नियमांचे पालन करत ब्रम्हांड कट्ट्याच्या वतीने सोशल मीडियाद्वारे रसिकांचे मनोरंजन केले जात आहे. कोरोना काळात घरात बसून कंटाळलेल्या रसिकांना विरंगुळा व्हावा या उद्देशाने ब्रह्मांड कट्ट्याच्या वतीने दर रविवारी विविध संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करतात. या रविवारी देसाईंच्या चित्रपटातील गाण्यांची मैफल रंगली.
किस्मत, छालिया, ब्लफ मास्टर, राजकुमार, आ गले लग जा, रामपूर का लक्ष्मण, सुहाग, धरमवीर, मर्द, कुली, देशप्रेमी, नसीब या सर्व गाजलेल्या चित्रपटांतील एकापेक्षा एक सुपरहिट गाणी या कट्ट्यावर सादर झाली. प्रसिद्द गायक जयंत घेगडमल, मनीषा ठाणेकर, अजय अंबोरे आणि कविता सपकाळे यांनी ही गाणी सादर केली. अजय अंबोरे यांनी सादर केलेले ताने दिन तंदाना या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
आजा आयी बहार, हुस्न चला कुछ ऐसी चाल, नाच मेरी बुलबुल, वादा करो नही छोडोगे, अठरा बरस की तू, हम बंजारोंकी बात, मा शेरोवाली, शिरडीवाले साईबाबा अशी अनेक गाणी कट्ट्याच्या गायक कलाकारांनी सादर केली.
------------------------------