सदानंद नाईक
महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पप्पु कलानी यांनी झंझावाती दौरा सुरू करून शहरातील वातावरण कलानीमय केले. दरम्यान शहरवासीयांच्या आशीर्वादाने जेल बाहेर आलो, नाहीतर जेल मध्ये मेलो असतो. अशी भावनिक साद कलानी हे झोपडपट्टीतील नागरिकांना घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उल्हासनगर म्हणजे पप्पु कलानी व पप्पु कलानी म्हणजे उल्हासनगर असे सूत्र गेली तीन दशकापासून कायम आहे. कलानी सलग चार वेळा आमदार पदी निवडून आले असून त्यापैकी २ वेळ जेल मध्ये असताना आमदार पदी निवडून आल्याने, त्यांच्या नावाची चर्चा राज्यात नव्हेतर, देशात झाली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पप्पु कलानी यांची कोविड काळात पेरॉलवर सुटका झाली. दरम्यान त्यांची धर्मपत्नी व माजी आमदार ज्योती कलानी यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. तेंव्हा पासून ते जेल बाहेर आहेत. त्यांनी आतापर्यंत भोगलेली शिक्षा व त्यांचे वय बघता त्यांची जेल मधून काही अटीशर्तीवर सुटका झाल्याचे बोलले जात आहे. त्यांनीही अनेकदा पेरॉलवर नव्हेतर कायमचा जेल बाहेर आल्याचे सांगितले. पेरॉलवर बाहेर आल्यानंतर पप्पु कलानी हे कुटुंबासह स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत परत आले. तेंव्हा पासून महापालिकेवर राष्ट्रवादी म्हणजे महाआघाडीची सत्ता येणार असल्याचे सांगत आहेत.
पप्पु कलानी हे राष्ट्रवादी पक्षातील नव्हेतर इतर पक्षाचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जात आहेत. तसेच झोपडपट्टी भागात जाऊन नागरिकांच्या समस्या एकून त्या सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. अशाच एका झोपडपट्टी नागरिका सोबत संवाद साधतांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जेल बाहेर आलो आहे. नाहीतर जेल।मध्ये मेलो असतो. अशी भावनिक साद घालणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या आठवड्यात भाजपच्या धरणे आंदोलनात पप्पु कलानी स्वतःहून सहभागी झाले. धोकादायक इमारतीचा अहवाल शासनाने प्रसिद्ध करावा. या मागणीला पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यांच्या याकृतीने भाजपच्या धरणे आंदोलनात फक्त कलानी यांचीच चर्चा होती.
भाजपचे धरणे आंदोलन केले हायजॅकशहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर, शासनाने एक समिती नेमली. मात्र एक वर्ष उलटूनही समितीने अहवाल प्रसिद्ध न केल्याने, भाजपने महापालिके समोर धरणे आंदोलन केले. मात्र भाजपच्या आंदोलनात स्वतः कलानी सहभागी होऊन आंदोलनच हायजॅक केल्याचे बोलले जात आहे.