भिवंडी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू झालेल्या सेवा सप्ताह पंधरवाड्यात भाजपा भिवंडी शहर जिल्हा कार्यकारणीच्या एक भारत श्रेष्ठ भारत विविधतेत एकता या उत्सवाचे आयोजन शनिवारी अंजुरफाटा येथील ओसवाल हॉल येथे करण्यात आले होते. यानिमित्त व्होकल फॉर लोकल या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत विविध राज्यातील संस्कृती नृत्याविष्कार, खाद्य संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून करण्यात आला.
याप्रसंगी आमदार महेश चौघुले,भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी ,आयोजन प्रमुख सुमित पाटील,माजी नगरसेवक निलेश चौधरी, प्रकाश टावरे,यशवंत टावरे,नित्यानंद नाडार यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाला खंबीर नेतृत्व देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या सत्ताकाळात खऱ्या अर्थाने समाजातील शेवटच्या घटका पर्यंत विकास पोहचविण्याचे काम केले जात आहे.म्हणूनच त्यांचा वाढदिवस लोकांमध्ये जाऊन लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. देशाच्या विविध राज्यातील सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या कला सादर करून आपण एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना राबवून हा विविधरंगी कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल आयोजकांचे अभिनंदन करीत मोदी यांच्या संकल्पनेतून आपल्या संस्कृती दर्शनाने एक भारत श्रेष्ठ भारत आहे हे दाखवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमात गुजराती - गरबा नृत्य, राजस्थानी - घुमर नृत्य,तेलंगणा - बत्तकुमा नृत्य,महाराष्ट्र - कोळी नृत्य,आदिवासी तारफा नृत्य,कर्नाटक - यक्षगान,बिहार उत्तर भारतीय - छठ पूजा व पंजाबी - भांगडा नृत्य सादर केली.तसेच कार्यक्रम ठिकाणी खाद्य संस्कृती स्टोलवर विविध राज्यातील खाद्य पदार्थ उपलब्ध करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा सरचिटणीस राजू गाजंगी यांनी तर सूत्रसंचालन मानसी राजे यांनी केले.