लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चिपळूणमधील डेरवण येथे झालेल्या युथ गेम २०२१ जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी उत्तम कामगिरी करत १३ सुवर्ण, १९ रौप्य व ४ कांस्यपदके पटकावून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
डेरवण येथे २७ व २८ मार्च या कालावधीत या स्पर्धा पार पडल्या. ब्रेकस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल, बटरफ्लाय या विविध क्रीडाप्रकारात जलतरणपटूंनी पारितोषिके पटकाविली. या स्पर्धेत ८ वर्षाखालील गटात मुलींमध्ये फ्रेया शहा हिने २ सुवर्ण व २ रौप्यपदके, श्रुती जांभळे हिने १ रौप्यपदक मिळवले. याच गटात मुलांमध्ये रुद्र निसार याने २ रौप्य, १ कांस्यपदक प्राप्त केले. कोविड १९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले वर्षभर तरणतलाव बंद होते. जवळपास १० महिन्यानंतर तरणतलाव सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव येथे जलतरणपटूंनी सराव केला होता.
१० वर्षाखालील गटात मुलींमध्ये आयुषी आखाडे हिने ३ सुवर्ण, ४ रौप्यपदके पटकाविली. याच गटात मुलांमध्ये विहान चतुर्वेदी याने ५ सुवर्ण, ३ रौप्य, विराट ठक्कर यांनी २ रौप्यपदकासह १ कांस्यपदक पटकाविले.
१२ वर्षाखालील गटात मुलांमध्ये इदांत चतुर्वेदी याने ३ सुवर्ण व १ कांस्यपदक तर आदित्य घाग याने २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदक मिळवले. १६ वर्षाखालील गटात मानव मोरे याने १ कांस्यपदक प्राप्त केले. ओजस मोरे, माही जांभळे, नक्ष निसार या ५ वर्षाखालील गटातील जलतरणपटूंनी स्पर्धा पूर्ण करीत चांगली कामगिरी केली. या स्पर्धकांना राज्य जलतरण संघटनेचे सदस्य राजेश मोरे, ठामपाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जलतरणपटू प्रशिक्षण घेत आहेत.