ठाणे : वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वात, येत्या शनिवार व रविवारी १ व २ जून रोजी सायं. ५ ते ८ यावेळात ठाण्यात मनोविकास या थीमवर तेरा वस्त्यांमधील कार्यकर्ते कलाकार स्वरचित नाटिका सादर करणार असल्याची माहिती समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय मंगला गोपाळ, बाल नाट्य संस्थेच्या प्रतिभा मतकरी व संयोजक हर्षदा बोरकर यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे कळविले आहे.
पत्रकात ते पुढे म्हणतात, वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोष म्हणजे लोकवस्तीतल्या संवेदनशील कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे व्यक्त होण्याची संधी आहे. एक चांगला, वेगळा व जबाबदार नागरिक घडविणे, हे या चळवळीचे ध्येय आहे. शरीराच्या सुयोग्य वाढीसाठी व सुंदर दिसण्यासाठी आपण धडपडतो तितकेच महत्व, मनाला सुंदर बनवण्यासाठी धडपडण्याला देणे म्हणजे मनोविकास. म्हणूनच यंदा इन्स्टिट्यूट फाॅर सायकाॅलाॅजिकल हेल्थ अर्थात आयपीएच चे प्रमुख व प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार डाॅ. आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने मनोविकास ही थीम नाट्यजल्लोष साठी निवडण्यात आली आहे. गेले चार महिने नाट्य, मनोविकास, लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध पैलूंवर डाॅ. आनंद नाडकर्णी, प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने, आयपीएचच्या वैदेही भिडे, शुभांगी दातार, संवेदनशील लेखिका, नृत्यांगना व नाट्यजल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर आदींच्या मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. १ व २ जूनला होणा-या या जल्लोषाच्या वेळी प्रसिद्ध रंगकर्मी मा. रत्नाकर मतकरी, नाट्यकर्मी उदय सबनीस, विजू माने, संतोष पाठारे, मेघना जाधव तसेच सामाजिक चळवळीतील वंदना शिंदे, प्रदीप इंदुलकर, सुरेंद्र दिघे, मयुरेश भडसावळे व अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात गोदुताई परूळेकर उद्यानात होत असलेल्या या कार्यक्रमाला ठाणे, मुंबई परिसरातील सर्व संवेेेदनशील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने साथी जगदीश खैरालिया, मनिषा जोशी, हर्षलता कदम, लतिका सु., मो., सुनील दिवेकर, अजय भोसले, निलेश दंत यांनी केले आहे.
*टॅग व आयपीएच च्या सहका-यांचे मार्गदर्शन*
समता विचार प्रसारक संस्था व बालनाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, ज्येष्ठ व संवेदनशील साहित्यिक रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेली पाच वर्षे ठाण्यात एकलव्यांसाठी सुरू आहे. नाट्य जल्लोषच्या ६ व्या पर्वात चिराग नगर, सावरकर नगर, मनोरमा नगर, शिवाजीनगर, माजिवडा, राम नगर, मानपाडा, भिवंडी, घणसोली आदी लोकवस्त्यांमधून मनोविकास या थीमअंतर्गत - कुटुंबातील संशयकल्लोळ, एखाद्या गोष्टीचा अतिरेकी आग्रह (ऑबसेशन), मोबाइलचा विळखा, सोशल मिडीया, पालक - बालक सुसंवाद, अंधश्रद्धा अशा विविध विषयांवर तेरा नाटिका सादर होणार आहेत. आयपीएच चे तज्ञ डाॅ. सुुुुरभी नाईक, डाॅ. सतीश नागरगोजे, सुलभा सुब्रमण्यम, डाॅ. स्वप्निल पांगे आदींच्या मार्गदर्शनाखाली या नाटिकांच्या संहिता लोकवस्तीतल्या मुली - मुलांनी स्वतः विकसित केल्या आहेत. या नाटिका बसवण्यासाठी विविध गटांना ठाणे आर्ट गिल्ड - टॅगचे कलाकार निलिमा सबनीस, रुपाली खैरनार, प्राची दुबे, राधिका भालेराव, मिताली, योगेश, वर्षा आदी सरावाच्या ठिकाणी जाऊन मदत करीत आहेत. या नाटिकांचे लेखन, दिग्दर्शन, संयोजनात विश्वनाथ चांदोरकर, भारती पाटणकर, निशीगंधा चुडजी, अनुजा लोहार, लता देशमुख, संदीप जाधव, इनाॅक कोलियार, आतेश शिंदे, दिपक वाडेकर, ओंकार जंगम आदी कसून मेहनत घेत आहेत. या १३ नाटिकांमधून सहा नाटिका पहिल्या फेरीत निवडून त्यांचे सादरीकरण साने गुरूजी स्मृती दिना निमित्त रविवार, दि. ९ जूनला ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार आहे.