कल्याण : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता असल्याने केडीएमसीच्या स्थायी समितीने सभांचा सपाटा लावला आला. दुसऱ्या शनिवारी महापालिकेला सुटी असतानाही आज सभा झाली. यामध्ये ३५ कोटींच्या खर्चाच्या विकासकामांचे विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. आजच्या सभेत खड्डे भरण्याच्या कामांसह विषय पत्रिकेवरील आठ व आयत्यावेळी घेतलेल्या चार विषयांना मंजुरी देऊ न सभा तहकूब करण्यात आली. १५ विषय प्रलंबित असून त्यासाठी सोमवारी सभा होणार आहे.प्रत्यक्ष मतदानापूर्वी ४५ दिवसआधी आचारसंहिता लागू होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक कामासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश निवडणूक विभागाने काढले आहेत. आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता असल्याने विकासकामांची मंजुरी खोळंबू नये यासाठी दोन आठवड्यांपासून स्थायी समितीच्या सभांचा सपाटा सुरू आहे.नालेसफाई, पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे यांचा समावेश असून मागील बैठकीत मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या विषयाला सभेने मंजुरी दिली आहे. त्यावेळी छोट्या नाल्यांच्या सफाईचा मुद्दा आला होता. हे विषय सोमवारच्या सभेत मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत, अशी माहिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वर्षभर करण्यात येते. पावसाळ््यापूर्वी, पावसाळ्यात, पावसाळ्यानंतर अशा तीन वेळा खड्डे भरले जातात. त्याला आज मंजुरी देण्यात आली. विविध मोबाइल कंपन्यांनी रस्ते खोदून ठेवले असून त्यांच्याकडून १६ कोटींची खड्डे फी महापालिकेने वसूल केली आहे. पुढच्या वर्षी २० कोटींची रक्कम महापालिकेस मिळणार आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाला सभेने प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या काही शाळा दुरुस्तीचे विषय महत्त्वाचे आहेत. तेही सोमवारच्या बैठकीत मार्गी लावले जाणार आहेत.सभा उशिरा सुरूसभा सकाळी १० वाजता होणार होती. मात्र, आयत्यावेळी घेतलेल्या विषयांचा घोषवारा परिपूर्ण नसल्याने सभा दुपारी २ वाजता सुरू झाली. तोपर्यंत सदस्य आणि अधिकारी थांबून होते. आयुक्त आजारी असल्याने ते रजेवर गेले आहेत. काही विषयांवर त्यांच्या सह्या होणे बाकी होते. त्यामुळे सभेला उशीर झाला.
स्थायीची १२ विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:40 PM