अंबरनाथ : अंबरनाथ येथील गार्डीयन दंत महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे समोर आल्यावर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. दंत महाविद्यालयाला आवश्यक असलेल्या अटी पूर्ण होत नसल्याने राज्य सरकारनेही या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दंत महाविद्यालयाला कायमची ‘दातखिळी’ बसली आहे. या महाविद्यालयात शिकणाºया १३४ विद्यार्थ्यांना दुसºया महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.अंबरनाथमधील बहुचर्चित आणि नेहमीच वादात सापडलेल्या गार्डीयन महाविद्यालय पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. या महाविद्यालयात २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षात प्रवेश घेतलेल्या १३४ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे. या महाविद्यालयाची मान्यताच रद्द केल्याने या विद्यार्थ्यांपुढे आता मोठी समस्या निर्माण झाली आहे. महाविद्यालयाची मान्यता रद्द करत असताना या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र असे असतानाही महाविद्यालय या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते. विद्यार्थ्यांना स्थलांतरीत होण्यासाठी महाविद्यालयात जमा केलेल्या कागदपत्रे आणि दाखल्यांची गरज आहे. मात्र ते देण्यासही महाविद्यालय तयार नव्हते. या प्रकरणात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती. या विद्यार्थ्यांच्या स्थलांतराला मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्यास मान्यता देत मुदतवाढही दिली आहे.राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार महाविद्यालयातील त्रुटी विचारात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने २०१७-१८ पासून महाविद्यालयाचे संलग्नीकरण कायमस्वरुपी रद्द केले आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयात बीडीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यापुढे या महाविद्यालयात दंत महाविद्यालय सुरू करता येणार नाही. महाविद्यालय कायमस्वरुपी बंद करत असताना या ठिकाणी शिकत असलेल्या १३४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांचे राज्यातील इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यात येणार आहे. दुसरीकडे या विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आदेश काढले आहेत. त्यानुसार २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यासाठी गुणवत्ता आणि पसंतीक्रमानुसार महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे प्रमुख अफान शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून त्रास देणे पुन्हा सुरूज्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर इतर महाविद्यालयात करण्यात येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणणे बंधनकारक आहे. त्याचा फायदा घेत गार्डीयन महाविद्यालयायाने पुन्हा विद्यार्थ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या विद्यार्थांनी गुणपत्रिकांची मागणी केल्यावर ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे.तर काही विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी केली जात आहे. सरकारने महाविद्यालय बंद केल्याने त्या विद्यार्थ्यांची सर्व महत्वाची कागदपत्रे आणि दस्तावेज त्यांना परत देणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही त्यांना ते कागदपत्रे मिळत नाही. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस दाद लागून देत नाही.
कायमची ‘दातखिळी’, गार्डियन दंत महाविद्यालयाची मान्यता रद्द, विद्यार्थांना अन्य महाविद्यालयात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 3:44 AM