उल्हासनगर : निवडणूक वर्षातील शेवटच्या स्थायी समिती सभापतीपदाची सूत्रे हाती यावीत, यासाठी शिवसेनेतील पाच जणांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने यावेळची निवडणूक चुरशीची होणार आहे. ही निवडणूक बुधवारी होणार असून सोमवारी अर्ज दाखल केले जातील. या पदाच्या शर्यतीतून भाजपाने माघार घेतली आहे. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना-भाजपा व रिपाईची महायुती सत्तेत आहे. महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद रिपाईकडे असून स्थायी समिती सभापतीपद भाजपाकडे होते. भाजपाने पुन्हा स्थायी समिती सभापतीपदासाठी रणनिती आखत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले होते. मात्र त्यांना यश आले नसल्याने त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर, वंदना पाटील, लीलाबाई आशान, शिवसेनापुरस्कृत विजय पाटील आणि सुनील सुर्वे असे पाच सदस्य आहेत. सुनील सुर्वे यांना स्थायी समिती सभापतीपदाचे वचन पालकमंत्र्यानी दिल्याने त्यांचे पारडे जड आहे. लीलाबाई आशान माजी महापौर आहेत, तर त्यांचा मुलगा अरूण आशान हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत. ते शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत.महापालिकेचे वादग्रस्त अधिकारी युवराज भदाणे यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या नगरसेविका वंदना पाटील, शिवसेना पुरस्कृत नगरसेवक विजय पाटील यांनीही सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे सभापतीपदाची माळ कोणाच्या गळयात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या बदल्यात भाजपाला चारपैकी दोन प्रभाग समित्यांचे सभापतीपद देण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत. (प्रतिनिधी) स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी सर्वाधिक पाच सदस्य शिवसेनेचे असून भाजपाचे तीन आणि रिपाईचा एक सदस्य आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, साई पक्ष-२, कॉग्रेस-१ असे पक्षीय बलाबल आहे. स्थायीसह प्रभाग समिती सभापतीपदासाठी सोमवारी अर्ज दाखल होतील आणि त्यातूनच अंतर्गत राजकारणाचे अर्धेअधिक चित्र स्पष्ट होईल.
उल्हासनगर स्थायीसाठी शिवसेनेत रस्सीखेच
By admin | Published: April 10, 2016 1:28 AM