३१५ पैकी २७० गणेश मंडळांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:53 AM2018-09-12T02:53:25+5:302018-09-12T02:54:21+5:30

यंदा प्रथमच गणेशोत्सव मंडळे आणि ठाणे महापालिकेने सामंजस्य दाखविल्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारचा वाद न होता, प्राप्त झालेल्या एकूण ३१५ अर्जांपैकी आतापर्यंत २७० मंडळांना परवानगी दिल्याची माहिती पालिकेने दिली.

Permission to 270 Ganesh Mandals of 315 | ३१५ पैकी २७० गणेश मंडळांना परवानगी

३१५ पैकी २७० गणेश मंडळांना परवानगी

Next

ठाणे : यंदा प्रथमच गणेशोत्सव मंडळे आणि ठाणे महापालिकेने सामंजस्य दाखविल्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारचा वाद न होता, प्राप्त झालेल्या एकूण ३१५ अर्जांपैकी आतापर्यंत २७० मंडळांना परवानगी दिल्याची माहिती पालिकेने दिली. उर्वरित मंडळांनाही ती दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
मागील महिन्यात गणेशोत्सव मंडळे आणि पालिका प्रशासन यांच्यात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या मध्यस्थीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आयुक्त संजीव जयस्वाल यांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावून गणेशोत्सव मंडळांना लवकरात लवकर परवानगी कशा देता येतील यासाठी पावले उचलल्याने यंदा ठाण्यात निर्विघ्न गणेशोत्सव साजरा होणार आहे. महापालिकेकडे प्रभाग समिती स्तरावर एकूण ३१५ अर्ज प्राप्त झाले होते.त्यापैकी २७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित मंडळांनाही याच धर्तीवर सायंकाळपर्यंत परवानगी दिली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप बांधताना, तो बांधून झाल्यानंतर आणि श्री गणेशाचे आगमन होण्यापूर्वी व श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तपासणी करावी, असे स्पष्ट करून परिमंडळ उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेले विशेष पथक निर्माण केले आहे. या विशेष पथकाद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाची तपासणी करण्याची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली आहे.
.अशी होत आहे पडताळणी
उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मंडपांची उभारणी करण्यात आली आहे काय, अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा आहे काय, मंडप बांधताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली आहे किंवा नाही या सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे. त्याचबरोबर गणेशाच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाहीसुद्धा पूर्ण झाली आहे.

Web Title: Permission to 270 Ganesh Mandals of 315

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.