ठाणे : बहिणीच्या मुलीशी (भाची) असलेल्या प्रेमसंबंधाची कुणकुण पत्नीला लागल्याने झालेल्या भांडणात तिची हत्या करून भिवंडीच्या नारपोलीतून भाचीसह फरार झालेल्या निरंकार भरत सिंह याला ठाणे पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखा-१ ने उत्तर प्रदेशातून गुरुवार, २९ मार्च रोजी रात्री तब्बल १० वर्षांनंतर अटक केली. मयत आन्ती निरंकार सिंह ऊर्फ शांतीदेवी ऊर्फ कोहली ऊर्फ नीलम (२५) ही आरोपीची दुसरी पत्नी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.निरंकार हा मूळचा उत्तर प्रदेशामधील आंबेडकरनगर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचे मयत आन्ती हिच्याशी लग्न होण्यापूर्वीही लग्न झाले होते. तिला सोडून त्याने आन्ती हिला भिवंडीत पळवून आणून दुसरे लग्न केले होते. ते दोघे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असताना त्याचे त्याच्याच बहिणीच्या मुलीशी प्रेमप्रकरण सुरू झाले. याचीच कुणकुण आन्ती हिला लागल्याने त्यांच्यात जोराचे भांडण झाले. दरम्यान, त्याने तिचा गळा आवळून डोके भिंतीवर आपटून हत्या केली. तसेच भाचीला घेऊन नारपोलीतून पळून गेला. त्यानंतर, त्याने भाचीशी तिसरे लग्न करून वेगवेगळ्या ठिकाणी तो राहू लागला. मागील एक ते दीड वर्षापासून तो आपल्या मूळ गावी घर बांधून राहत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संजय दळवी यांना मिळाली होती. याबाबत शहानिशा झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व त्यांच्या पथकाने उत्तर प्रदेश एसटीएफ यांच्या मदतीने त्याला अटक केली आहे. हा गुन्हा २००८ साली घडला होता.गळा आवळून हत्यासुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद के ली होती. मात्र, शवविच्छेदनात मयत आन्ती हिची गळा आवळून हत्या झाल्याचे पुढे आले. तसेच निरंकार यानेच आन्ती हिची हत्या केल्याचे तपासात निष्पन झाले आहे.
पत्नीची हत्या करणाऱ्यास यूपीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:14 AM