लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या पेणकरपाडा येथे मोबाईल आदी इलेक्ट्रिक वस्तुंनी भरलेल्या टेम्पोचे लॉक तोडून माल चोरी प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी गुजरात मधून एकास अटक करून २१ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . तर आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत असून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुमारे ५०० सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले .
भिवंडी वरून टेम्पोतून भाईंदर येथील क्रोमाच्या दुकानात देण्यासाठी टीव्ही , फ्रिज , मोबाईल , वीज उपकरणे , हार्डडिस्क , पेनड्राइव्ह आदी एसेसरीज आदी वस्तू आणल्या होत्या . नेहमीप्रमाणे टेम्पो पेणकरपाडा येथील गणेश मंदिर जवळच्या सार्वजनिक रस्त्यावर उभा केला होता. टेम्पोच्या दाराचे लॉक तोडुन अज्ञात चोरट्याने आतील मोबाईल , पेनड्राईव्ह, हेअर ड्रायर, इलेक्ट्रॉनिक घड्याळ , हार्डडिस्क आदी २१ लाख ९१ हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या प्रकरणी १ एप्रिल रोजी काशीमीरा पोलिसांनी अनिकेत पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला .
परिमंडळ १ चे उपायुक्त जयंत बजबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक प्रकाश कावरे सह अनिल पवार, सचिन हुले, निलेश शिंदे, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, रविंद्र कांबळे, प्रविण टोबरे, जयप्रकाश जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला .
गांगुर्डे व पथकाने घटनास्थळा पासूनचे तसेच प्रमुख भागातील सीसीटीव्ही पाहून त्याचा मागोवा घेण्यास सुरवात केली . पोलिसांनी सुमरे काशीमीरा पासून थेट गुजरातच्या वलसाड पर्यंतचे जवळपास ५०० हुन अधिक सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले . माहितीच्या आधारे विशाल रमेश राजभर यास सिवील हॉस्पीटल परिसर, वलसाड येथे सापळा रचून ताब्यात घेतले.
चोरी केलेल्या मालमत्तेपैकी २१ लाख ६० हजारांचे मोबाइल तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य व उपकरणे आरोपी कडून हस्तगत केली आहेत . राजभर हा सराईत गुन्हेगार असुन मुंबई, ठाणे, वलसाड आदी भागात त्याच्यावर घर फोडी व बतावणीचे १० हुन अधिक गुन्हे नोंद आहेत . तर आकाश सुशील मंडल, रा. पेणकरपाडा, मीरारोड याच्या सोबत मिळून राजभर याने गुन्हा केल्याचे समोर आले असून त्याला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"